लातूर: लातूर तालुक्यातील एकुर्गा येथील ऊसाच्या क्षेत्रावरील ३३ के. व्ही. लाईनच्या एबीसी मेन स्वीचमध्ये शॉर्ट सर्कीट होऊन आग लागल्याने अनेक शेतकऱ्यांचा ३० ते ४० एकर क्षेत्रावरील ऊस जळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र लातूर महानगर पालिकेचे उप महापौर देविदास काळे यांनी अग्नीशामन दलास वेळीच घटनास्थळी पाचारण केल्यामुळे अग्नीशामन दलाने ऊसास लागलेली आग अटोक्यत आणून परिसरातील उर्वरीत ऊस व एकुर्गा गावास आगीपासून वाचवून मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती भाजपाचे लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे यांनी दिली.
एकुर्गा शिवारातून जात असलेल्या ३३ के.व्ही. लाईनच्या मेन स्वीचमध्ये शॉट सर्कीट होऊन ०८ ते १० शेतकऱ्यांच्या ३० ते ४० एकर क्षेत्रावरील ऊसास आग लागली असल्याची माहिती एका शेतकऱ्याने भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांना शुक्रवारी फोनवरुन दिली असता तात्काळ रमेशअप्पा कराड यांनी भाजपाचे लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे व भाजपा कार्यकर्त्यांना एकुर्गा येथे घटनास्थळी अग्नीशामन दलासह पोहचण्याच्या सुचना केल्या. दरम्यान विजय काळे यांनी लातूर महानगर पालीकेचे उप महापौर देविदास काळे यांना सबंधित घटनेची माहिती दिली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्नीशामन दलास घटनास्थळी पाचारण केले. अग्नीशामन दलाने एकुर्गा येथील शेतकरी व नागरीकांच्या सहकार्याने ऊसास लागलेली आग आटोक्यात आणून परिसरातील उर्वरीत ऊस अगीपासून वाचवला. त्याचबरोबर एकुर्गा गाव सबंधीत अगीपासून जवळच असल्याने गावासही आगीपासून धोका होण्याची शक्यता होती मात्र अग्नीशामन दलाने सबंधीत आग अटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
या आगीत एकुर्गा येथील ०८ ते १० शेतकऱ्यांचा ३० ते ४० एकर क्षेत्रावरील ऊस व ऊसातील थिबक, स्प्रिंकलर पाईप, पिव्हीसी पाईप व शेतातील फळांची झाडे, जनावरांचा कडबा, गुळी जळून खाक झाली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शुक्रवारी दुपारी ऊसास आग लागली असता अग्नीशामन दलासाठी शेतकऱ्यांनी मांजरा व विकास कारखान्याशी संपर्क केला मात्र तेथून प्रतिसाद मिळाला नाही, अशी व्यथा येथील शेतकऱ्यांनी मांडली, असा दावा भाजपाचे लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे यांनी दिली.
Comments