लातूर: स्वतंत्र्यानंतर आजपर्यंत वडार समाजाला काँग्रेसने कधीच न्याय दिला नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी आणि उन्नत्तीसाठी अनेक योजना मंजूर करून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. असे प्रतिपादन भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांनी केले. लातूर तालुक्यातील मौजे चिखुर्डा येथील वडार समाजाला बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते नुकतेच झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विमुक्त घुमंतु जनजाती विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे हे होते तर याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय क्षीरसागर, लातूर तालुका संगायोचे अध्यक्ष साहेबराव मुळे, कृऊबा संचालक तात्याराव बेद्रे, भाजपाचे विस्तारक दिलीप पाटील, चेअरमन दगडु बंडगर, महादेव रोंगे, विनायक सुरवसे, मजहर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रमेशअप्पा कराड म्हणाले की, देशाच्या जडण-घडणीत वडार समाचा मोठा वाटा आहे. मात्र या समाजाला स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने कधीच न्याय देण्याची भुमिका घेतली नाही. लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या सार्वजनीक कार्याची सुरुवात भटक्या विमुक्तांपासून केली. मी ही याच भटक्या विमुक्त कुटुंबातील असून माझाही समाज वाडी वस्तीत राहतो, तुम्ही दगड मातीचे काम करता आणि माझा समाज ऊस तोडणीचे काम करतो त्यामूळे मला तुमच्या दु:ख़ाची जाण आहे. चार बगल बच्यांची उन्नत्ती म्हणजे विकास नाही तर वाडी वस्तीत राहून मोल मजुरी करणार्यांना न्याय देण्याची भुमिका असली पाहिजे लातूरच्या वडार समाज मेळाव्यात मुखमंत्री फडणवीस दिलेल्या अश्वासनाप्रमाणे अनेक योजना मंजूर करून या समाजाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. गरजवंतांची गरज पूर्ण करणारे भाजपाचे केंद्र आणि राज्य सरकार आहे, असेही रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले. बांधकाम कामगार प्रमाणपत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या २५ योजनांचा लाभ होणार आहे ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल असून याचा वडार समाज बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करून सत्ता असो अथवा नसो आम्ही सतत तुमच्या सोबत आहोत असीही ग्वाही शेवटी रमेशअप्पा कराड यांनी दिली.
यावेळी बोलताना दिलीप धोत्रे यांनी वडार समाजाचे प्रश्न मुखमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे आणि कामगार कल्याण कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हेच सोडवू शकतात. भाजपाचे सरकारच गोर गरीबांना न्याय देणारे सरकार आहे, असे बोलून दाखविले. चिखुर्डा येथील वडार समाजाच्या वस्तीत झालेल्या या कार्यक्रमात अनेकांना बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास वडार समाज बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन ब्रम्हा बंडगर यांनी केले.
Comments