HOME   लातूर न्यूज

इ-कचरा देऊन नागरिकांनी मिळविले मिक्सर, डिनर सेट, टी-शर्ट.

नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांचा प्रभाग ०५ मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम


इ-कचरा देऊन नागरिकांनी मिळविले मिक्सर, डिनर सेट, टी-शर्ट.

लातूर: शहरातील प्रभाग ५ चे नगरसेवक व मनपाचे माजी स्थायी समिती सभापती विक्रांत गोजमगुंडे हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी ओळखले जातात. प्रभागाच्या घनकचरा व्यवस्थापनात त्यांनी यापूर्वीही उल्लेखनीय कार्य केलेले आहे, यात भर टाकत प्रभाग ५ मध्ये इ-कचरा संकलन अभियान राबविण्यात आले. मराठवाड्यात प्रथमच राबविण्यात आलेल्या या उपक्रमास प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांच्याकडील बंद पडलेले टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, घड्याळे, टेलिफोन, डीव्हीडी प्लेयर, इलेक्ट्रॉनिक खेळणी, रिमोट, ट्यूब, बल्ब असे विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहीत्य मनपास प्रदान केले. यात सहभागी झालेल्या नागरिकांची लकी ड्रॉ च्या माध्यमातून निवड करण्यात आली व विजेत्यांना महाराष्ट्र प्रदूषण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी व्यंकट शेळके मनपा सहायक आयुक्त वसुधा फड तसेच योजनेचे प्रायोजक विनायक चन्नागिरे, मेहुल पूनपाळे, अंकुश वरयानी यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
घनकचरा व्यवस्थापनातील अत्यंत घातक असणार्‍याच इ कचऱ्यापासून मानवी शरीराला गंभीर आजारांचा धोका असतो त्याच बरोबर या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करावी लागते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पासून निर्माण होणारा कचरा म्हणजेच इ कचरा हा दिवसेंदिवस वाढत असून त्याचे संकलन व विल्हेवाट लावणे ही मनपा समोरील सर्वात मोठी अडचण ठरते. परंतु अशा उपक्रमांमधून यावर सहज मात करता येते. नागरिकांकडून जमा करण्यात आलेला कचरा नोंदणीकृत इ कचरा प्रक्रिया केंद्रास पाठवला जाणार असून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. या योजनेत सहभागी झालेले विजेते प्रथम- चंद्रसेन झांबरे, द्वितीय- अब्दुल मजीद, तृतीय- लक्ष्मी कांबळे, कविता सूर्यवंशी, वर्षा गायकवाड तर उत्तेजनार्थ अभिषेक बडे, मधुबाला साबदे, नारायण मोहेकर, मीरा माने, वैजनाथ गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, दिपाली सोमवंशी, बबीता शिंदे यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. संकलन अभियान यशस्वी करण्याकरिता स्वच्छता निरीक्षक मुनीर शेख, आशिष साठे, सुर्यकांत काळे, स्वयंप्रकाश वैरागे, सुनिता उबाळे, रेखा लांडगे व मनपाचे अधिकारी कर्मचारी यांनी पुढाकार घेतला..


Comments

Top