लातूर-मुंबई: लातूर जिल्हा न्यायालयालयासाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्याने न्यायालयानजीक असणारी जुन्या विश्रामगृहाची जागा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. लातूर जिल्हा वकील मंडळाने ही जागा न्यायालयाला देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. त्यानुसार हा निर्णय देण्यात आला आहे. लातूर जिल्हा न्यायालयाला अतिरिक्त जागा मिळविून देण्यात जिल्हा वकील मंडळाला आलेल्या यशाबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जिल्हा वकील मंडळाचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲड .अण्णाराव पाटील, ॲड. व्यंकट बेद्रे, ॲड. मनोहरराव गोमारे, ॲड. उदय गवारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
लातूर येथील ज्येष्ठ विधिज्ञांच्या शिष्टमंडळाने चार वर्षापूर्वी आमदार अमित देशमुख यांची भेट घेऊन ही जागा मिळणे बाबत विनंती केली होती. आमदार देशमुख यांनी वकील मंडळाची मागणी आणि वाढत्या लातूरची गरज ओळखून हा विषय शासनाकडे सातत्याने लावून धरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनेकवेळा भेट घेवून या मागणीचा पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री यांनीही या लातूरकरांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून स्वागतार्ह भूमिका घेतली त्यांच्या सुचनेनुसार राज्य शासनाने लातूर जिल्हा न्यायालयासाठी सदरील जागा देण्याचा निर्णय घेवून तो निर्णय मुंबई उच्च न्यायालया समोर ठेवला होता. त्यामुळे न्यायालयाकडून लातूरच्या हिताचा निर्णय होवू शकला. लातूर जिल्हा न्यायालयासाठी अतिरीक्त जागा मिळणार असल्याने लातूर शहरात विखुरलेली विविध न्यायालये या परिसरात एकत्र येतील त्यामुळे सामान्य जनतेची सोय होणार आहे. शिवाय न्यायालयातील प्रकरणाचा अधिक जलद गतीने निपटारा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आमदार देशमुख यांनी व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लातूर जिल्हा न्यायालयाचे कामकाज प्रशस्त जागेत होणार असल्याने येथील वकील मंडळा प्रमाणे मलाही आनंद झाला आहे, असे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या प्रसिध्दी पत्रकात म्हटले असून शासन आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी या प्रक्रीयेत सहकार्य केल्या बददल त्यांचेही आभार मानले आहेत.
Comments