लातूर: अशोक हॉटेल चौकातील विसावा विश्रामगृहाची जागा तात्कालीन कॉंग्रेस नेत्यांनी नाममात्र दरात विकासाच्या नावाखाली बगलबच्यांच्या घशात घालण्याचे काम केले होते. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा कोट्यवधी रूपये किंमतीची असतानाही केवळ आपल्या जवळील लोकांचा विकास व्हावा याकरीताच ही जागा विकासकाच्या घशात घालण्यात आलेली होती. वास्तविक पाहता ही जागा न्यायमंदिरासाठी मिळावी याकरीता लातूरच्या वकील संघाने सातत्याने मागणी करून त्याबाबत पाठपुरावा केलेला होता. अखेर या जागेसाठी न्यायालयीन लढा वकील संघाने दिला. या लढाईत वकील संघाचा विजय होवून ही जागा जिल्हा न्यायालयास सरकारने तत्काळ हस्तांतरीत करावी असे आदेश न्यायालयाने दिले.
न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विसावा विश्रामगृहाची जागा लातूरच्या न्यायालयास हस्तांतरीत करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करत त्यास मंजुरी दिली. सबका साथ... सबका विकास... हीच भूमिका गेल्या चार वर्षापासून केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार पार पाडत आहे. या भूमिकेमुळे विसावा विश्रागृहाची जागा न्यायालयाला तात्काळ हस्तांतरीत करण्यास मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी आभार व्यक्त केले आहेत. तसेच यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले आहेत.
Comments