HOME   लातूर न्यूज

खंडणीखोरांना तात्काळ जेरबंद करून कडक कारवाई करावी

शहर जिल्हा भाजपाचे पोलीस प्रशासनास निवेदन


खंडणीखोरांना तात्काळ जेरबंद करून कडक कारवाई करावी

लातूर: शिक्षणाच्या लातूर पॅटर्नचा देशभरात नावलौकिक आहे. या पॅटर्नमुळेच शहरात अनेक शैक्षणिक संस्था व खाजगी शिकवण्या मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या पॅटर्नला कलंक लावत खाजगी शिकवण्यांकडून खंडणी उकळणार्‍यांना तात्काळ जेरबंद करून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी शहर जिल्हा भाजपाच्यावतीने पोलीस प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शैक्षणिक हब म्हणून उदयास आलेल्या लातूरला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जावू लागले. या शिक्षण पंढरीत शैक्षणिक संस्थांसह खाजगी शिकवण्याही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत आहेत. या पॅटर्नमुळे देशभरातील विद्यार्थ्यांचा लातूरकडे मोठ्या प्रमाणात ओढा आहे. मात्र या पॅटर्नला कलंक लावण्याचे काम काही समाजकंटकांकडून होवू लागले आहे. नुकतीच एका खाजगी शिकवणी चालकास खंडणीसाठी अपहरण करण्याची घटना घडलेली आहे. या प्रकरणी दोन नगरसेवकांसह एका संघटनेच्या संस्थापक अध्यक्षावर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी एका नगरसेवकास अटक करण्यात आलेली असली तरीही आणखी आरोपी मोकाटच आहेत. या मोकाट खंडणीखोरांना तात्काळ जेरबंद करून त्यांच्याविरुध्द कडक कारवाई व्हावी तसेच शहर व परिसरात संघटनेचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालेला असून या संघटनांकडून सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन होत आहे. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बोकाळलेली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
या खंडणीखोरासंह संघटनांवर कायदेशिर कारवाई करून शहराला भयमुक्त करावे अशी मागणी शहर जिल्हा भाजपाच्यावतीने पोलीस प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. या निवेदनावर शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, उपमहापौर देविदास काळे, नगरसेवक हणमंत जाकते, सुनील मलवाड, गुरूनाथ मगे, महेश कौळखेरे, दिपक आवस्कर, नगरसेविका शोभा पाटील,रागिनी यादव, मीना भोसले, स्वाती जाधव, गणेश हेड्डा, अमोल गीते, अमोल पाटील, प्रकाश वाघमारे, अमर गायकवाड, गुरूप्रसाद हुंडेकर, चंद्रशेखर डांगे आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांना देण्यात आले आहे.


Comments

Top