लातूर: राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर येथील नवीन एमआयडीसी परिसरातील रेल्वे बोगी कारखान्याच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी रेल्वे विकास निगमचे अधिकारी तसेच संबंधित गुत्तेदार यांना रेल्वे बोगी कारखान्याचे काम जलद गतीने करुन विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेशकुमार मेघमाळे, रेल्वे प्रकल्पाचे व्यवस्थापक विरणदरण, रेल्वे विकास निगम लिमीटेडचे एम.एस. मूर्ती, शरद जागर, संबंधित गुत्तेदार आदी उपस्थित होते. पालकमंत्री निलंगेकर यांनी रेल्वे बोगी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करुन कामाच्या गतीबद्दल समाधान व्यक्त केले. परंतु हा प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाची गती वाढवावी, असे निर्देश ही त्यांनी दिले.
रेल्वे बोगी कारखान्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते ३१ मार्च २०१८ रोजी झाले होते. त्यानंतर विविध प्रक्रिया पूर्ण होऊन या प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. या प्रकल्पामुळे लातूरसह मराठवाडयातील हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून लातूर परिसराचा विकासही मोठया प्रमाणावर होणार आहे. हा प्रकल्प लातूर जिल्हयासह मराठवाडयासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे.
Comments