लातूर: जिल्हा निवडणूक विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशव्दारात ईव्हीएम व्हीव्हीपॅट (EVM VVPAT ) मशिन ठेवण्यात आलेली असून जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या मशिनबाबत माहिती देऊन प्रबोधन केले जात आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशिनची माहिती जाणून घेतली. तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री निलंगेकर यांना ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशिनची सविस्तर माहिती देऊन मतदान करण्याचे प्रात्यक्षीक ही दाखविले. यावेळी पालकमंत्री निलंगेकर यांनी स्वत: प्रात्यक्षिक करुन व्हीव्हीपॅट मशीन मध्ये मतदान केलेल्या पावतीची पाहणी केली. एकंदरीतच या निवडणूक विभागाच्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती अभियान मोहिम व मशिनबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूर जिल्हयातील प्रत्येक गावात जाऊन तेथील नागरिकांना ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनबाबत प्रात्यक्षिक दाखविले जाणार असून या अभियानातून प्रत्येक नागरिकाला या मशीनबाबत माहिती दिली जाणार असल्याचं सांगितलं. या जनजागृती अभियानाचा शुभारंभ लातूर तहसिल कार्यालयातून ०१ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आला असून पुढील ४५ दिवस गावोगावी जाऊन लोकांना हया मशीनची माहिती प्रशासनामार्फत दिली जाणार असल्याचे ही त्यांनी सांगून प्रत्येक मतदाराला या मशीनबाबत प्रबोधित केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री निलंगेकर यांच्या समवेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे आदी उपस्थित होते.
Comments