लातूर: जिल्हयातील नागरिकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना जागृत रहावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून क्रीडा संकुलात १५० फूट उंचीचा राष्ट्रध्वज निर्माण केला जात आहे. या राष्ट्रध्वजाचे उद्घाटन दिनांक १८ जानेवारी २०१९ रोजी होणार असून यावेळी लातूर शहरातील शासकीय व खाजगी शाळांमधील 11 हजार 111 विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रध्वज उद्घाटन पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महापालिकेचे उपायुक्त संभाजी वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, शिक्षणाधिकारी (प्रा.) औदुंबर उकिरडे, शिक्षणाधिकारी (मा.) वैशाली जमादार, गट शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्यासह शासकीय व खाजगी शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, क्रीडा संकुलात निर्माण होत असलेला १५० फूट उंचीचा राष्ट्रध्वज हा मराठवाडयातील पहिलाच एवढया उंचीचा ध्वज असणार आहे. या ध्वजाकडे पाहून प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी यांचा राष्ट्र अभिमान जागृत झाला पाहिजे व राष्ट्र प्रेमाची ही भावना कायम तेवत राहण्यासाठी हा राष्ट्रध्वज महत्वपूर्ण आहे. क्रीडा संकुलात राष्ट्रध्वज निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले असून १८ जानेवारी २०१९ रोजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रध्वजचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी लातूर शहरातील शासकीय व खाजगी शाळांमधील इयत्ता ०५ वी ते नववीपर्यंतच्या ११ हजार १११ विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन देशभक्तीपर ११ गितांचे सामुहिक गायन केले जाणार आहे, प्रत्येक शाळा मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाकडून देण्यात येणाऱ्या ११ गितांचे पुढील आठ ते दहा दिवस आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षीक करुन घ्यावेत असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जण गण मन, वंदे मातरम्, झेंडा ऊंचा रहे हमारा, सारे जहाँ से अच्छा, हम होंगे कामयाब, हिंद देश के निवासी, जय जय महाराष्ट्र माझा, हे राष्ट्र देवतांचे, बलसागर भारत होवो, संत महंताची भूमी (मराठवाडा गीत) व जय स्तुते अशी ११ देशभक्तीवर गितांचे सामूहिक गायन ११ हजार १११ विद्यार्थ्यांकडून १८ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे.
Comments