लातूर: देशातील प्रत्येक समाजाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न भाजपाने मागील साडेचार वर्षात केला आहे भविष्यातही समस्यामुक्त भारत बनवण्याची योजना आहे. यासाठी भाजपाला पुन्हा एकदा संधी द्या. बुद्धिजीवी वर्गाने प्रेक्षक न बनता वातावरण निर्मिती करावी. ही तुमची जबाबदारी आहे, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. लातूर दौऱ्यावर असणाऱ्या अमित शहा यांनी लातुरातील मान्यवरांशी दयानंद सभागृहात संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर ,खा. सुनील गायकवाड, महापौर सुरेश पवार, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होते.
अमित शहा म्हणाले की, विचारांची ताकद नसल्याने सत्तर वर्षात काँग्रेसला विकासकामे करता आली नाहीत. कॉंग्रेसने परिवारवाद व जातीयवाद वाढवून लोकशाही संपुष्टात आणली. त्यांना कोणाचाही विकास करावयाचा नव्हता. विकासाच्या दृष्टिकोनाचा अभाव असल्याने त्यांना कसलीही कामे करता आली नाहीत. याउलट भाजपाने अवघ्या साडेचार वर्षात विकास करून दाखवला. भाजपाकडे दृष्टिकोन असल्याने हे शक्य झाले. या काळात सहा कोटी कुटुंबांना गॅस दिला. आठ कोटी शौचालय बांधून दिली. गरीबांना उपचारासाठी पाच लाख रुपयांपर्यंतच्या योजना दिल्या. सहा लाख रुग्णांनी याचा लाभ घेतला. दृष्टिकोन व गरिबाबत संवेदना नसल्याने काँग्रेस हे काम करू शकली नाही. भाजपाने मात्र सर्व विषयातील द्वंद्व संपवले. सर्वांचाच विकास केला परंतु हे करताना सीमा सुरक्षेत कसलीही तडजोड केली नाही. यामुळे देशाचा गौरव वाढला. जगात आज मोदीचा गौरव होतो तो मोदींचा नाही तर सव्वाशे कोटी जनतेचा गौरव असल्याचे अमित शहा म्हणाले. मागच्या पाच वर्षात सरकारने ३० मोठे निर्णय घेतले. लोकांना चांगले वाटतील त्यापेक्षा लोकांसाठी चांगले असणारे निर्णय घेण्यावर सरकारचा भर आहे. प्रसंगी कडू औषधांचाही वापर करावा लागला. परंतु भविष्याचा विचार करून तसे निर्णयही आम्ही घेतल्याचे शहा म्हणाले. काँग्रेसने आकाश, पाताळ, अंतरिक्षातही घोटाळे केले आहेत. हा पक्ष राफेल प्रकरणी घोटाळ्याचा आरोप करत आहे. परंतु त्यात कवडीचाही घोटाळा झाला नाही. काँग्रेस भ्रम वाढवत आहे. भाजपाला मात्र देशातील लोकशाही वाचवायची आहे. पहिल्यांदाच अठरा तास काम करणारा पंतप्रधान मिळाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाच विजयी होणार असल्याची खात्री अमित शहा यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी बोलताना रावसाहेब दानवे पाटील यांनी केंद्र सरकारचे लातुरकडे विशेष लक्ष असल्याचे सांगितले. प्रास्ताविक करताना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर ही ज्ञानाची खाण असल्याचा आवर्जून उल्लेख केला. व्यापारी वर्गामुळे लातूरची देशपातळीवर ओळख निर्माण झालेली आहे .विविध बाबतीत लातूर पॅटर्न देशात नावाजला गेला असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments