लातूर: स्त्रियांचे आरोग्य सुधारायला हवे त्यांना प्रजनन संस्थेचे आजार होऊ नयेत याकरिता वेळीच उपाययोजना केल्या पाहिजेत तसेच मुलींना शारीरिक स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक केले पाहिजे असे अनेक विचार मांडण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ठोस कृती होत नाही ही बाब लक्षात घेत लातूर मधील प्रयोगशील नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या प्रेरणेने अस्मिता महिला बचत गटाच्या वतीने लातूर शहरात सॅनेटरी नॅपकिन चा वापर वाढविणे बाबत प्रयत्न केले जात आहेत. महिलांमध्ये याबाबतची जागरुकता वाढावी यासाठी जनजागृतीही केली जात आहे.
काही दिवसापूर्वी मनपा शाळेतील मुलींसाठी या बचत गटाने सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध करून दिली होती आता यामध्ये भर टाकत प्रभाग ५ मधील रमाई आंबेडकर स्त्री रुग्णालय येथेही नव्याने सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्यात आली आहे. याद्वारे महिलांना ५ रुपयात २ सॅनेटरी नॅपकिन मिळवता येणार आहेत, तसेच प्रभाग ५ मधील सुमारे २००० कुटुंबांना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात येत आहे. लातूर शहरामध्ये प्रथमच अशा पद्धतीचा उपक्रम राबविण्यात येत असून महिलांची शारीरिक स्वच्छते प्रति जागरूकता वाढावी व सॅनिटरी नॅपकिन चा वापर वाढवा याकरिता हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती अस्मिता महिला बचत गटाच्या मार्गदर्शिका सौ वर्षा विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
प्रभाग ५ मधील लेबर कॉलनी येथील रमाई आंबेडकर स्त्री रुग्णालय येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात या उपक्रमाचा शुभारंभ प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ सुजाता काळे, डॉ सुनीता मंदाडे, नगरसेविका पूजा पंचाक्षरी, शिवलीला चोळखणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या सामाजिक उपक्रमांमध्ये इतरांनीही सहभाग नोंदवावा असे आवाहन अस्मिता महिला बचत गटाच्या वतीने करण्यात आले यास प्रतिसाद देत डॉ सुनीता मंदाडे यांनी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी मंदाडे हॉस्पिटलच्या वतीने सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात येईल असे घोषित केले. अस्मिता महिला बचत गटाचा हा उपक्रम महिलां च्या आरोग्याकरिता दूरगामी परिणाम करणारा ठरेल अशा शब्दांमध्ये डॉ सुजाता काळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमास स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रदीप ढेले, डॉ प्रीती बादाडे डॉ कमल चामले, डॉ कापसे, डॉ गुरुडे, डॉ वंगे यांच्यासह अस्मिता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुमती कासले सचिव सविता कावळे सदस्या कीर्ती व्हसाळे, शालू सरकाळे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्त्री रुग्णालयाच्या वतीने अस्मिता महिला बचत गटाचे आभार व्यक्त करण्यात आले.
मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप
अस्मिता महिला बचत गटाच्या वतीने मनपा शाळा व स्त्री रुग्णालय येथे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्यात आली असून आता प्रभाग पाचमधील दोन हजार कुटुंबांना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात येणार आहे शहरांमध्ये अशा पद्धतीचा राबविण्यात येत असलेला हा पहिलाच उपक्रम ठरावा. याकरिता येणारा सर्व खर्च हा महिला बचत गटाच्या सदस्यांच्या वतीने केला जात आहे.
Comments