HOME   लातूर न्यूज

सरकारच्या निर्णयांचा देशावर विपरीत परिणाम

क्रांती यात्रेत धीरज देशमुख यांचा दावा


सरकारच्या निर्णयांचा देशावर विपरीत परिणाम

लातूर-खामगाव: मोठ-मोठी आश्वासने देत सत्ता हस्तगत केलेल्या भाजप सरकारच्या निर्णयांचा देशाला फायदा होण्याऐवजी त्या निर्णयाचा विपरीत परिणाम देशावर झाला असून देश विकासाच्या बाबतीत मागे ढकलला गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातात राज्य व देशातील सत्ता सुजाण नागरीकांनी द्यावी असे आवाहन जि.प.सदस्य धीरज देशमुख यांनी केले आहे.
अखिल भारतीय युवक काँग्रेसच्यावतीने कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत युवा क्रांती यात्राचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनात व अखील भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष केशवचंद यादव, उपाध्यक्ष बी. श्रीनिवास यांच्या नेतृत्वात निघालेली यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आयोजित जनसभेत धीरज देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. राजीव सातव, अखील भारतीय यूवक कॉंग्रेसचे अध्यक्ष केशवचंद यादव, उपाध्यक्ष बी. श्रीनिवास, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, प्रदेश युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी जितेंद्र देहाडे आदींची प्रमुख ऊपस्थिती होती.
पुढे बोलताना धीरज देशमुख म्हणाले की, खोटं बोल पण रेटून बोल ही संस्कृती भाजपवाल्यांची असून जीएसटी, नोटाबंदी व अन्य निर्णयामुळे देशाच्या विकासाला खीळ बसली आहे. विकासाचे कोणतेही काम न करता केवळ आश्वासने देण्यात हे सरकार मग्न आहे. काँग्रेसच्या काळातील योजनांची नावे बदलून उद्घाटन करत फिरणारे भाजपचे राज्यातील व केंद्रातील मंत्री प्रभावहीन ठरले आहेत. याउलट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशवासीयांच्या महत्वाच्या प्रश्नावर आवाज उठवत आहेत. काँग्रेसपक्षच ख­र्‍या अर्थाने देशाचे हीत जोपासू शकते, त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता देशात व राज्यात प्रस्थापित करून देश एकसंघ ठेवणेही काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन यावेळी धीरज देशमुख यांनी केले.


Comments

Top