लातूर: महाराष्ट्रात लिंगायत समाजाची लोकसंख्या १० टक्के असून त्या तुलनेत राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळत नाही. लोकसंख्येचा विचार करून या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी शिवा लिंगायत युवा संघटनेच्या वतीने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत लिंगायत समाज आणि या समाजातील उपजातींना न्याय मिळत नाही. राज्याच्या सीमावर्ती भागात हा समाज मोठ्या संख्येने आहे. सीमेलगत असणाऱ्या नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आदी भागातून लोकसभेचे ०८ आणि विधानसभेचे ४० उमेदवार निवडून येऊ शकतात. या भागात लिंगायत समाजाची लोकसंख्या ४० टक्के आहे. यापुर्वी राज्यात २४ आमदार आणि ०३ खासदार होते. आता मात्र केवळ ६ आमदार आणि १ खासदार आहे. लिंगायत समाजाची जेवढी भागीदारी आहे त्या प्रमाणात वाटा मिळावा अशी समाजाची मागणी आहे. राज्यात समाजाची लोकसंख्या एक कोटी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत याचे प्रमाण १० टक्के आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात या समाजाचा सन्मान झाला पाहिजे. त्यामुळे या समाजाला योग्य प्रतिनिधित्व देऊन न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील, शिवराज शेटकार, सुभाष मुक्ता, बसवराज पाटील कौळखेडकर, मल्लिकार्जुन शंकर, मनिषा बोळशेट्टे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी गुरुनाथ मगे, नागनाथ निडवदे, प्रेरणा होनराव उपस्थित होते.
Comments