HOME   लातूर न्यूज

कव्वाल अजमेरी व साबरी यांनी जिंकली रसिकांची मने

हजरत सुरतशाहवली यांच्या ३८० व्या उरुसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम


कव्वाल अजमेरी व साबरी यांनी जिंकली रसिकांची मने

लातूर: लातूर शहर तसेच परिसरातील सर्वधर्मीय समाज बांधवांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हजरत सुरतशाहवली यांच्या ३८० व्या उरुसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात कानपुर येथील कव्वाल लतीफ अजमेरी व मुजफ्फरनगर येथील राज साबरी यांच्या कव्वालीने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. कडाक्याच्या थंडीतही कव्वालीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हजरत सुरतशाहवली यांच्या उरुसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षी कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या कार्यक्रमासाठी कानपुर येथील कव्वाल लतीफ अजमेरी व मुजफ्फरनगर येथील राज साबरी यांना निमंत्रित करण्यात आले होते. आपल्या कव्वालीच्या माध्यमातून या दोन्ही नामांकित कव्वालांनी सुफी संतांनी दिलेला एकतेचा, सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. यावेळी उर्स कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष चांदपाशा इनामदार, लातूर शहर मनपाचे स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे, जमील मिस्त्री, अ‍ॅड फारुख शेख, खय्यूम शेख, गोरोबा लोखंडे, रमेशसिंह बिसेन, राम कोंबडे, नजीर शेख, निजाम अन्सार, अमीर बागवान, शेख मुस्तफा, इस्माईल लाला, नसीर पानवाले, अखिल शेख यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


Comments

Top