HOME   लातूर न्यूज

निटूर परिसरातील शेतकर्‍यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार

महामार्गातून शेतकर्‍यांना न्याय, वीस फुटांचा वाढीव रस्ता, केंद्राकडे पाठपुरावा


निटूर परिसरातील शेतकर्‍यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार

लातूर: शेतकर्‍यांसह ग्रामीण भागातील जनतेच्या विकासाला अधिक चालना मिळावी याकरीता पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणण्यास सुरूवात केली आहे. त्या अनुषंगाने निटूर येथील ७५२ क हा महामार्ग जात आहे. मात्र या महामार्गा लगत असलेल्या शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होत होत्या. त्या अडचणी जाणून घेत पालकमंत्री निलंगेकर यांनी शेतकर्‍यांची गरज लक्षात घेवून वाढीव रस्त्यांसाठी २० फूट जमीन संपादीत करण्याचा ठराव घेवून यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. याबद्दल निटूर परिसरातील शेतकर्‍यांनी पालकमंत्री निलंगेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून अवघ्या संपूर्ण देशभरात महामार्ग उभारणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील जनतेसह शेतकर्‍यांच्या विकासालाही अधिक चालना मिळावी याकरीता लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यासह निलंगा मतदारसंघातील महामार्गाचे जाळे विणण्यास सुरूवात केली आहे. निलंगा मतदारसंघातील निटूर परिसरातून ७५२ क हा महामार्ग जात आहे. मात्र हा महामार्ग अधिक वाढीव व्हावा, जेणेकरून शेतकर्‍यांचे हित साधले जाईल असा सूर शेतकरी वर्गामध्ये होता. सदर अडचण लक्षात घेवून पालकमंत्री निलंगेकर यांनी मागील महिन्यात निलंगा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेतकर्‍यांची बैठक आयोजित करून शेतकर्‍यांचे प्रश्‍न व अडचणी जाणून घेतल्या होत्या. या बैठकीत शेतकर्‍यांची गरज लक्षात घेवून पालकमंत्री निलंगेकर यांनी महामार्गासाठी अधिक २० फुटाची जमीन संपादीत करण्याचा ठराव घेवून तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठवलेला आहे. सदर प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावाही सुरू केलेला आहे. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यास शेतकर्‍यांचे हित साधले जाणार आहे.
पालकमंत्री निलंगेकर यांनी केंद्र स्तरावर याचा पाठपुरावा सुरू केल्याबद्दल निटूर परिसरातील केळगाव, ताजपूर, शेंद, मुगाव, निटूर, गौर, मसलगा व पानचिंचोली परिसरातील शेतकर्‍यांनी पालकमंत्री निलंगेकर यांची भेट घेवून त्यांचे आभार व्यक्त केले. या भेटीमध्ये निटूर परिसरातील शेतकरी रमेश पाटील, वामन चौरे,जनार्धन सोमवंशी, रोहीत पाटील, ज्ञानोबा पाटील, गोविंद कोरे, बाबासाहेब पाटील, दत्ता पिंड, आनंद कुलकर्णी, भागूराम चामे, वामन मानकोसकर, रावसाहेब काळे, राजेंद्र देतकर, गोविंद शिंदे, अंकुश घारूळे, राम चौरे, हरी घारूळे, दगडू दुधभाते, गोविंद बालवडे, शिवाजी कत्ते, गोवर्धन जाधव, पिंटू घारूळे, विठ्ठल शिंदे, संजय चामे, राजेंद्र कासळे आदी शेतकर्‍यांनी पालकमंत्री निलंगेकर यांचा सामुहिक सत्कार केला. याप्रसंगी पालकमंत्री निलंगेकर यांनी भूसंपादनाचा प्रस्ताव लवकरच मंजूर होवून त्याचा मावेजा शेतकर्‍यांना देण्यासाठी आपण बांधील असल्याची ग्वाही दिली.


Comments

Top