लातूर: सेंद्रिय साखर उत्पादनाचा देशात पहिला यशस्वी प्रयोग करणाऱ्या लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या (निवळी) संचालक मंडळाने यासंदर्भातील अद्यावत माहिती मिळविण्यासाठी सांगली व सातारा जिल्ह्याचा नुकताच अभ्यास दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी सांगली जिल्ह्यातील विटा येथील सेंद्रिय खत बनवणाऱ्या ‘नेचर केअर फर्टिलायझर’ या कारखान्यास तसेच सातारा येथील सेंद्रिय पीकवर्धक आणि किटकनाशके बनवणाऱ्या प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. सेंद्रिय पध्दतीने शेती केल्यास पिकांची वाढ चांगली होते, कमी खर्चात अधिकचे उत्पादन येऊ शकते याचा प्रत्यक्ष अनुभव विलास कारखान्याच्या संचालक मंडळाने या अभ्यास दौऱ्यात घेतला. जयंत बर्वे यांनी अगदी खडकाळ जमीनीवर घेतलेला पूर्व हंगामी ऊस आणि त्याची उत्तमरित्या झालेली वाढ पाहून संचालक मंडळाने आश्चर्य व्यक्त केले. सेंद्रिय शेती म्हणजे जमीनीचे पोषण असून रासायनिक शेती म्हणजे आपल्या शेतीचे शोषण असल्याचे बर्वे यांनी यावेळी अभ्यास दौऱ्यातील शिष्टमंडळाला सांगितले. कमी खर्चाबरोबरच कमी पाण्यात सेंद्रिय शेती होऊ शकते, हे बर्वे यांनी प्रयोगातून सिध्द केले असल्याचा प्रत्यक्ष अनुभव यावेळी आला. याच भागात प्रकाश कदम या शेतकऱ्याने एकरी १५० टन ऊस उत्पादन घेण्याचा उद्देश ठेवून केलेल्या शेतीस भेट देण्यात आली. या प्रयोगात कदम यांनी ३० हजार रुपयांची ग्रीन हॉवेस्टर, सारथी व पृथ्वी ही सेंद्रिय खदे वापरली असून ३० हजार रुपयांची रासायनिक खते वापरली आहेत. एकूण ६० हजार रुपये खर्च करुन एकरी १५० टन ऊस उत्पादन काढण्याचे उदिष्ट त्यांनी ठेवले आहे. ‘त्यांची आडसाली पद्धतीची ऊस शेती’ एकात्मीक खत व्यवस्थापनेचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
या अभ्यास दौऱ्यावर गेलेले संचालक सुर्यकांत सुडे, उमेश बेंद्रे, गोवर्धन मोरे, चंद्रकांत टेकाळे, भैरवनाथ सवासे, नितीन पाटील, नरसिंग बुलबुले, अनंत बारबोले, युवराज जाधव, भारत आदमाने, रवींद्र काळे, नेचर केअरचे जयदेव बर्वे यांच्या समवेत ऊसविकास अधिकारी कदम आदी होते. या सर्वांनी जयदेव बर्वे यांच्या सेंद्रिय उपक्रमाचे कौतुक करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments