HOME   लातूर न्यूज

महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर याना शिष्टमंडळाचे निवेदन


महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

लातूर : अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा निर्णय सरकारने रद्द केला आहे. याच्या निषेधार्थ लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर याना निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या वतीने देण्यात आला.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासकीय कर्मचाऱ्यासांसाठी लागू केलेला १ एप्रिलचा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा शासन निर्णय अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी फेब्रुवारीपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जसाच्या तसा लागू केला. परंतु, हा निर्णय शासनाने ७ डिसेंबर २०१८ रोजी पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील हजारो महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. यामुळे या विरोधात महाराष्ट राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ शाखा नांदेड विभागाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पालकमंत्री याना भेटलेल्या शिष्टमंडळात कर्मचारी महासंघाचे महासंघ प्रतिनिधी तथा विभागीय सहसचिव धनराज जोशी, डॉ. संजय मोरे, डॉ. विनोद घार, चंद्रकांत तिडके, शशी साळुंके, राजेश सेलूकर, दत्ता आळंदकर, शिवलिंग गौड, श्री. जागळे, श्री. बेंदरगे आदींसह पदाधिकारी बांधवांचा समावेश होता. निवेदनाची प्रत खासदार सुनील गायकवाड, आमदार अमित देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, अभिमन्यू पवार यांनाही देण्यात आली आहे.
नेमका शासन निर्णय काय?
ज्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे पद उपलब्ध नाही व त्यांना पदोन्नती मिळाली नाही, अशा कर्मचाऱ्यांना व १२ ते १४ वर्षांच्या समाधानकारक सलग सेवेनंतर पुढील पदोन्नतीची वेतनश्रेणी मिळते असा निर्णय होता. हा निर्णय रद्द केल्याने कर्मचारी आक्रमक झाले असून, आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


Comments

Top