लातूर : लातूर शहराचे वैभव समजल्या जाणाऱ्या नाना-नानी पार्कवर अनेक झाडे आहेत. मात्र अमरवेल नावाच्या वेलने या झाडांना घेरल्याने झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर असून अनेक झाडे वाळली आहेत. वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने अनेक झाडांवरील ही घातक अमरवेल रविवारी श्रमदानातून काढण्यात आली. मनपाने लक्ष देऊन लवकरात लवकर फवारणी करावी आणि झाडे वाचवावीत अशी मागणीही करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात वनक्षेत्र अत्यल्प असून एक एक झाड जगविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. शहरातील नाना-नानी पार्क येथे अनेक चांगली झाडे आहेत. मात्र गेल्या काही दिवसात या झाडांवर अमरवेल नावाच्या घातक वेलीने विळखा घातला आहे. यामुळे झाडे वाळून जात असून झाडांचे मोठे नुकसान होत आहे. यावर वेळीच लक्ष न घातल्यास सर्वच झाडांचे अस्तित्व धोक्यात येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वसुंधरा प्रतिष्ठानच्या लक्षात ही बाब आल्यानंतर लागलीच श्रमदान करून रविवारी झाडांवरील या अमरवेली हटविण्यात आल्या आहेत. शिवाय याकडे तात्काळ लक्ष देऊन फवारणी करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, शहराध्यक्ष उमाकांत मुंडलीक, उपाध्यक्ष रामदास घार, सदस्य प्रशांत स्वामी उपस्थित होते.
वसुंधरा प्रतिष्ठानचे पदाधिकारी हे अमरवेल काढताना तिथे माजी नगरसेवक नरेश पंड्या यांनी भेट देऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी महापौर सुरेश पवार आणि संबंधीत कर्मचारी यांना फोनद्वारे झाडांच्या अवस्थेची माहिती दिली. लवकरच याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन महापौर पवार यांनी दिले.
Comments