लातूर: केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने औसा तालुक्यातील लोदगा येथे २५ ते २७ जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी केंद्रीय कृषी व पंचायतराज राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला लोदगा येथे येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
वातावरणातील बदल व नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील नामांकित २०० सेवाभावी संस्था यात सहभागी होणार आहेत. शुक्रवारी (दि २५ ) सकाळी ११ वाजता केंद्रीय राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते या कार्यशाळेचे दीप प्रज्वलन करून पारंपारिक पद्धतीने उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एनआयआरडी चे कार्यकारी संचालक डब्लू. आर. रेडडी यांची उपस्थिती राहणार असल्याचेही पाशा पटेल यांनी सांगितले.
पाशा पटेल म्हणाले की, मराठवाड्याचे वाळवंट होईल असे भाकीत शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. मराठवाड्यात सैन्याच्या माध्यमातून वृक्षारोपण करावे लागेल अशाही बातम्या येऊन गेल्या आहेत. मराठवाड्यासाठी नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन कार्यक्षम पद्धतीने कसे करावे यासंदर्भात फिनिक्स फाऊंडेशन व एनआयआरडी पर्याय शोधण्याचे काम करणार आहेत. अफार्म व वनराई यासारख्या संस्थांचा सहभाग या तीन दिवसीय कार्यशाळेत होणाऱ्या चर्चासत्रात राहणार आहे. मानव वाचवणे आणि निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने, शेती उजाड़ होऊ नये यासाठी भविष्यात काही कार्यक्रम राबवावे लागणार आहेत. या कार्यशाळेतून नक्कीच मराठवाडा आणि महाराष्ट्राला नवी दिशा दिली जाईल अशी माहितीही पाशा पटेल यांनी दिली.
Comments