HOME   लातूर न्यूज

‘या शेतीचं करायचं काय?’ परिसंवादाचे आयोजन

स्वाराती व्याख्यानमालेत तज्ञ, मान्यवर कार्यकर्त्यांचा सहभाग


‘या शेतीचं करायचं काय?’ परिसंवादाचे आयोजन

लातूर: येथील स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने शनिवार, दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात ' शेतीचं काय करायचं ? ' या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले विख्यात लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे, शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीचे सदस्य राजाभाऊ देशमुख आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रा. नागनाथ कनामे हे सहभागी होणार आहेत. या परिसंवादात शेती समस्यांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना तसेच समाजातील इतर घटकांना काय करता येणे शक्य आहे? शासकीय धोरणात कसे बदल व्हावेत? अशा विविध पैलूंवर मांडणी होणार आहे. पंचवीस वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यात झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपात संपूर्ण देश मदतीसाठी धावून आला आणि भूकंपग्रस्तांच्या अनेकांगी समस्यांच्या सोडवणुकीत सहभागी झाला. सध्या मराठवाड्यातील शेतकरी हे नैसर्गिक व मानवी, शासकीय व सामाजिक तसेच स्थानिक आणि जागतिक अशा असंख्य प्रकारच्या समस्यांनी ग्रासून गेला आहे. हवामान बदलाच्या झळा त्यांना सहन कराव्या लागत आहेत. अनेक वेळा पाऊस गायब होतो. कधी पिकांच्या काढणीच्या वेळी जोरदार पाऊस येतो तर कधी गारपीट होते. पीक चांगले आले तर बाजारात भाव कोसळतात. एकंदर शेतकरी विविध प्रकारच्या अडचणींना सातत्याने सामोरे जात आला आहे. वाढत जाणारा शेतीचा उत्पादन खर्च आणि तुटपुंजे उत्पन्न यामुळे त्याला शेती नकोशी वाटत आहे. यामुळे खचून जाणारे अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय क्लेशदायक प्रश्न झाला आहे. अशा बिकट प्रसंगी संपूर्ण समाजाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालाच्या वतीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादास लातूर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने श्रीनिवास लाहोटी, श्रीमती सुमती जगताप, अतुल देऊळगावकर यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


Comments

Top