लातूर: दुष्काळी स्थितीमुळे अगोदरच संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा सरकार घेत आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी दि २८ जानेवारी रोजी साखर संघावर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले असून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन लातूर व उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे यांनी केले आहे.
यावर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे शेतात उभा असणारा ऊस करपून जात आहे. हा ऊस कारखान्याने नेल्यानंतर त्याला उतारा कमी येत आहे. याच्या जोडीलाच जाहीर केल्याप्रमाणे एफआरपी एकरकमी मिळत नाही. गतवर्षी २२०० रुपये एफआरपी देण्यात आली होती. यंदा काही कारखानदार केवळ १७०० रूपये देत आहेत तर काही कारखानदारांनी एक रुपयाही दिलेला नाही. एकरकमी एफआरपी न दिल्यास कारवाई करण्याची घोषणा सरकारने केली होती. पण कारवाई झाली नाही. राज्याच्या सहकार मंत्र्यांचाच कारखाना एफआरपी देत नाही, असे मोरे यांनी सांगितले. राज्यात ४८ खासदार आहेत पण खा. राजू शेट्टी वगळता इतर एकही खासदार या प्रश्नावर बोलण्यास तयार नाही. सरकारने ऑनलाईन नोंदणी केलेल्या तूर आणि हरभऱ्यासाठी १ हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. पण आतापर्यंत अनुदान मिळाले नाही. विविध बाजूनी अडचणीत असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्याना न्याय देण्यासाठी खा. शेट्टी यांनी २८ रोजी पुणे येथे साखर संघावर मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. मते मागण्यासाठी सर्व पक्षाचे नेते शेतकऱ्यांकडे येतात पण अडचणी सोडविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. ही शेतकऱ्यांची लढाई आहे. या लढाईत सामील व्हावे असे आवाहनही मोरे यांनी केले.
Comments