HOME   लातूर न्यूज

मुरुड नगरपरिषदेची अधिसुचना जाहिर

रमेशअप्पा कराड यांच्या पाठपुराव्याला यश, मुरुडात स्वागत


मुरुड नगरपरिषदेची अधिसुचना जाहिर

लातूर: जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुरुड शहराला नगरपरिषद म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली असून मंगळवार, २२ जानेवारी रोजी राज्याच्या नगरविकास विभागाने मरुड नगरपरिषदेचा आदेश व अधिसुचना जाहिर केली आहे. मुरुड शहराला नगरपरिषदेचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मुरुडला नगरपरिषद केल्यामुळे मुरुडकरांची गेल्या अनेक वर्षांची मागणी पुर्णत्वास आली असून या निर्णयाचे मुरुड येथील नागरीकांकडून स्वागत होत आहे.
लातूर तालुक्यातील मुरुड शहर हे जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून सर्वपरिचीत आहे. चांगले शिक्षण व मोठी बाजारपेठ म्हणून मुरुडचा नावलौकिक असून येथील शहरीकरणातही दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुरुड शहराचा विकास होत नव्हता. राज्यात भाजपा सत्तेत आल्यापासून मरुड शहराला नगरपरिषदेचा दर्जा मिळावा यासाठी भाजपा नेते रमेशअप्पा कराड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात व मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या सहकार्याने वेळो-वेळी पाठपुरावा करीत होते. तसेच ०७ जानेवारी रोजी चिंचोली ब. येथे पार पडलेल्या भाजपा मेळाव्यात रमेशअप्पा कराड यांनी आपल्या भाषणात मुरुड शहराच्या सर्वांगिण विकासासाठी या शहराला शासनाने नगरपरिषदेचा दर्जा द्यावा व मुरुड येथे १०० खाटांचे रुग्णालय मंजूर करावे अशी मागणी या मेळाव्यास उपस्थित असलेल्या राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे केली होती.
दरम्यान मंगळवार, २२ जानेवारी रोजी राज्याच्या नगरविकास विभागाने मरुड नगरपरिषद गठीत करण्यासाठी आदेश व अधिसुचना जाहिर केली असून मुरुड नगरपरिषद क्षेत्रात मुरुड ग्रामपंचायतीचे संपूर्ण गावठाण व मुरुड ग्रामपंचायत गावाचे सर्व्हे नं. ०१ ते ८३९ या क्षेत्राचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयासाठी “ट्रॉमा केअर युनिट” नुकतेच मंजूर करण्यात आले असून ट्रॉमा केअर युनिटसाठी राज्य शासनाने सात कोटी रुपये एवढा निधी मंजूर करुन या कामास तांत्रीक मान्यता प्रदान केली आहे.


Comments

Top