लातूर: राष्ट्रध्वज ही आमचीही अस्मिता आहे. लातूर शहरात राष्ट्रध्वज उभारला गेला त्याचा आम्हालाही अभिमान आहे. परंतु आमच्या अस्मितेच्या आड काळेबेरे होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. मराठवाडयात सर्वांत उंच राष्ट्रध्वज औरंगाबाद येथे आहे असे असतांना सर्वांत उंच राष्ट्रध्वज उभारल्याचे खेाटे सांगत लातूरकरांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार झाला. विशेष म्हणजे ध्वज उभारणीसाठी ७५ लाख रूपये खर्च झाला हे जनतेसमोर सादर करा, असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले. एनएसयुआय लातूरतर्फे येथील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या विदयार्थी सुविधा केंद्राचे उदघाटन आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आमदार देशमुख बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. विक्रम हिप्परकर, यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.व्यकंट बेद्रे, एनएसयुआयचे मराठवाडा निरीक्षक सचिन संत्रे, मनपातील विरोधी पक्षनेते ॲड.दीपक सुळ, नगरसेवक पप्पू देशमुख, आयुब मनियार, योजना कामेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अवाजवी भाडेवाढी विरोधात काँग्रेस न्यायालयात जाईल
महानगरपालिकेने लातूर शहरातील मनपाच्या गाळेधारकांवर अवाजवी भाडेवाढ लादली आहे. तशा नोटीसाही बजावल्या आहेत. एकीकडे राज्य सरकारने लातूरात दुष्काळ जाहीर केलेला असतांना दुसरीकडे मनपाकडून शहरातील व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून भाडे वसूलीची मोहिम राबविली जात आहे. भाडेवाढ नैर्सर्गिक असायला कोणचीही हरकत नाही. परंतु चौपट भाडेवाढ केल्याने ग्रामीण भागातील आत्महत्येचे लोण आता शहरातही येऊ पाहत आहे. मनपाने जागे व्हावे नोटीसा परत घ्याव्यात अन्यथा काँग्रेस पक्ष अवाजवी भाडेवाढीच्या विरोधात न्यायालयात जावून व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देईल, असेही आमदार अमित देशमुख यावेळी म्हणाले
सुपरस्पेशालीटी हॉस्पिटलला आघाडी सरकारची मंजुरी
शहरातील गांधी चौकात उभे राहात असलेल्या सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलला तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी मंजूरी दिलेली आहे. या हॉस्पिटलचा प्रस्ताव लोकनेते विलासराव देशमुख यांनी सादर केला होता, असे असतांना विदयमान सत्ताधारी हे आम्हीच केले असे सांगून जनतेची दिशाभूल करीत असल्याचेही आमदार देशमुख म्हणाले.
Comments