लातूर: ‘अविरत सेवामहे’ हे ब्रीद घेऊन कुठल्याही सामाजिक कामाला नाही न म्हणणारे डॉ. अशोक कुकडे यांना सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविले. रात्री उशिरा जाहीर झालेल्या यादीत एकूण ११२ पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. ०४ पद्मविभूषण, १४ पद्मभूषण तर ९४ पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा यात समावेश आहे. यात २१ महिला आणि ११ परदेस्थही आहेत.
लातुरच्या विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे नाव आज दूरदूरपर्यंत घेतले जाते. अशोक कुकडे या प्रतिष्ठानचे प्रमुख आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही मोठं काम डॉ. कुकडे यांनी केलं. सध्या ते संघाचे क्षेत्र संचालक आहेत. १९६६ साली स्थापन झालेल्या विवेकानंद रुग्णालयाचे विश्वस्त म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले. अनेक रक्तपेढ्या, सेवा प्रकल्प, निवासी विद्यालये रुग्णालये यांचे मार्गदर्शक आणि सल्लागार म्ह्णून ते काम पहात आहेत. भारतीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली. कथा एका ध्येय साधनेची हे आत्मचरित्र आणि ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक अण्णा पेंडसे यांचेही चरित्र लेखन त्यांनी केले. शतायुषी पुणे, पु. भा. भावे, जीवन गौरव असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. जलयुक्तच्या कामात त्यांनी मोठी आघाडी घेतली होती. त्याबद्दल त्यांना ‘किर्लोस्कर वसुंधरा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ. हेडगेवार रुग्णालय, श्री गुरुजी रुग्णालय आदी संस्थात आणि त्यांच्या उपक्रमात ते सदैव सहभागी असतात. पुण्याच्या बीजे मेडीकल महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएस केलं. यात ते विद्यापिठात प्रथमही आले होते. १९६५ साली त्यांनी जनरल सर्जरीमध्ये एमएसही केलं आहे.
कुकडे यांचे वय ८० आहे. एका अर्थाने ते रिटायर्ड झाले असले तरी टायर्ड झाले नाहीत. त्यांची अथक सेवा अजूनही चालूच आहे अशी प्रतिक्रिया त्यांची मुलगी अनघा लव्हळेकर यांनी दिली. डॉ. कुकडे यांना मिळालेला हा पद्म पुरस्कार त्यांच्या कार्याचा सन्मान आहे. याबद्दल कधी विचारही केला नव्हता. त्यांना मिळालेल्या यापुरस्कारातून अनेकांना सेवाभाव जपण्याची प्रेरणा मिळेल असं त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना कुकडे म्हणाल्या.
वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा अत्यंत मानाचा असा पद्म भूषण पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांनी डॉ. अशोक कुकडे यांचा शुक्रवारी लातूर येथे सत्कार केला.
(छाया- शाम भट्टड)
Comments