लातूर: आंबुलगा ता. निलंगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाल्याबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये राज्याचे कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह २९ जणाची येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, आंबुलगा ता. निलंगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाण्याच्या १५ वी व १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २९ डिसेंबर २००६ रोजी कारखाना स्थळावर आयोजित केली होती. या सभेच्या ठिकाणी तत्कालीन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे आपल्या कार्यकर्त्यासह उपस्थित राहणार अशी कुणकूण लागल्याने कारखाना प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते उपस्थित असताना संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सभेच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करत असताना शाब्दीक बाचाबाची झाली यावेळी सभागृहाचा त्याग करत बाहेर आले. त्याप्रसंगी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी लाठीचार्ज करून अश्रूधूर सोडला. या गोंधळामुळे उपस्थित जनसमुदाय धावू लागला. यावेळी शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले होते. तर अनेक शेतकरी जखमी झाले होते. शिवाय विश्वनाथ लांबोटे या शेतकऱ्यांचा या गोंधळा दरम्यान मृत्यू झाला होता. कांही पोलिस व पोलिस आधिकारीही जखमी झाले होते. याबाबत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, पंचायत समितीचे सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, विनोद आर्य, ईश्वर पाटील, दगडू सोंळूके, सत्यवान धुमाळ, चंदर पाटील यांच्यासह अन्य २९ जणावर सहाय्यक पोलिस निरिक्षक चतुर्भूज काकडे यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वे गुन्हे दाखल झाले होते. याबाताचा तपास करून दोषारोपपत्र येथील न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर अतिरीक्त संचालक. जिल्हाधिकारी, पोलिस विभाग या समितीकडून राजकीय पक्ष्यांच्या कार्यकर्त्यावरील गुन्ह्याबाबत दिलेल्या अहवालानुसार येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. पठाण यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह २९ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. ही माहिती वकील सी. जे. सबनीस, हेमंत गायकवाड, सुनील माने, एम. के. वलांडे यांनी काम पाहीले.
Comments