लातूर: येथील गाव भागात प्राचीन व्यंकटेश बालाजी मंदिर आहे. या मंदिरच्या संगमरवरी दगडाचे हेमाडपंथी जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, सचिव विनोद अग्रवाल व कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कांताप्रसाद राठी यांनी दिली. व्यंकटेश बालाजी मंदिरच्या जिर्णोद्धाराच्या बांधकामासाठी राजस्थानमधून गुलाबी रंगाचे संगमरवरी (स्टॅंडस्टोन) दगड आणण्यात आले. बांधकाम नकाशानुसार या दगडाची मशीनद्वारे कटई करण्यात आली. या दगडावर नक्षीकामही करण्यात आले आहे. या जिर्णोद्धार कामासाठी कारागिरही राजस्थानमधूनच आणण्यात आले होते. मंदिराची लांबी १३५ फूट असून रूंदी ८० फूट आहे. सभामंडप ७५ बाय ७५ चा असून त्याची उंची २७ फूट आहे.
व्यंकटेश बालाजी मंदिरच्या जिर्णोद्धाराची उभारणी अखंड संगमरवरी दगडातून करण्यात आली असून हे बांधकाम हेमाडपंथी अखंड दगडामध्ये आहे. दगडामध्ये नक्षीकामाबरोबरच कोरीव कामही करण्यात आले आहे. बांधकाम करताना या दगडात विष्णूंचे आठ अवतार कोरण्यात आले आहेत. श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात आणखीन तीन लहान मंदिरे आहेत. या जिर्णोद्धाराच्या कामासाठी ०७ कोटी रूपये खर्च आला असून हा निधी भाविक-भक्तांनी दिलेल्या देणगीतून जमा झालेला आहे. जिर्णोद्धारातून निर्माण झालेले मंदिर अतिशय देखणे झाले असून या वास्तूमुळे लातूरच्या वैभवात भरच पडली आहे. २००६ पासून या मंदिरच्या जिर्णोद्धाराचे कार्य सुरू आहे. देवस्थानचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, सचिव विनोद अग्रवाल, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कांताप्रसाद राठी, विश्वस्त-पदाधिकारी यांनी अखंड परिश्रम घेतले. राजस्थानमध्ये जाऊन दगड निवडण्यात आले. वास्तू विशारद शांतेश्वर बरबडे यांनी हे जिर्णोद्धाराचे कार्य पूर्ण केले आहे. या उभारणीत सर्वांचेच हातभार लागले असल्याचे विनोद अग्रवाल यांनी सांगितले.
Comments