लातूर: येथील गावभागातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात ८ ते १५ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मंदिरचा जिर्णोद्धार व पुन:प्राणप्रतिष्ठापना महोत्सव आणि श्री रामकथेचे आयोजन करण्यात आले असून, त्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, सचिव विनोद अग्रवाल व विश्वस्त डॉ. अनिल राठी यांनी रविवारी मंदिरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कांचीपूरमचे श्री श्री १००८ श्री श्रीनिवासाचार्यजी स्वामीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली १२ कुंड होमहवन, जिर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. तो ०८ ते १५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत चालणार आहे. या कालावधीत विविध धार्मिक, अध्यात्मिक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास श्री अनंताचार्य श्रीबालक स्वामीजी, श्री श्रीरामानुजाचार्य श्रीनिधी स्वामीजी, श्री इंदिरारमण स्वामीजी व श्री व्यंकटेशप्रपन्नाचार्य स्वामीजी उपस्थित राहणार आहेत. श्री रानानंदजी भटर स्वामीजी हे श्री श्रीनिवासाचार्य स्वामीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली विविध धार्मिक विधी, होमहवन संपन्न करतील, असे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कांताप्रसाद राठी यांनी सांगितले. श्री रामाणाचार्य ढोक महाराज यांची श्री रामकथा ०८ ते १४ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत दुपारी ०२ ते सायंकाळी ०५ या वेळेत संपन्न होणार आहे. तसेच ०८ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दररोज रात्री ०८ वाजता कीर्तन होणार आहे. ०८ फेब्रुवारी रोजी हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, ०९ ला हभप बाबासाहेब इंगोले महाराज, १० ला हभप बन गुरूजी, ११ ला हभप गुरूनाथ महाराज देगलूरकर, १२ ला हभप दिनकर महाराज शेवगावकर, १३ ला हभप किशोर महाराज आरजखेडकर, १४ ला हभप महेश महाराज कानेगावकर व १५ फेब्रुवारी रोजी सकाळी संजय महाराज उमरखेडकर यांचे सकाळी ११ वाजता काल्याचे कीर्तन होणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी यांनी सांगितले.
श्री व्यंकटेश बालाजीची मुर्तीची ७० वर्षांपूर्वी प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आलेली आहे. आता जिर्णोद्धारातून व हेमाडपंथी बांधकामातून नवीन मंदिर साकारले आहे. या मंदिरात या मुर्तीची पुन:प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच श्री महालक्ष्मी (पद्मावती देवी), श्री रामानुज स्वामीजी, श्री गरूड भगवान, श्री हनुमानजी, अन्नपूर्णा देवी व श्री जय-विजय यांच्या नवीन मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.मंदिरच्या जिर्णोद्धाराचे कामही पूर्ण झाले आहे, अशी माहिती प्रास्ताविकात विश्वस्त डॉ. अनिल राठी यांनी दिली.
श्री रामकथेसाठी मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला असून रामकथेच्या मुख्य यजमान विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख या आहेत. रामकथा, जिर्णोद्धार व पुन: प्राणप्रतिष्ठापना महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या तयारीसाठी देवस्थाचे पदाधिकारी, विश्वस्त, भावीक-भक्त गेल्या महिनाभरापासून परिश्रम घेत असल्याचे देवस्थानचे सचिव विनोद अग्रवाल यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कांताप्रसाद राठी, देवस्थानचे उपाध्यक्ष पांडुरंग मुंदडा, नारायणदास भांगडीया, प्रकाश कासट, नयन नावंदर, ओमप्रकाश डागा, लक्ष्मीनिवास अग्रवाल, कमलकिशोर अग्रवाल, संजय बियाणी, वास्तूविशारद शांतेश्वर बरबडे, प्रदीप धूत, रामेश्वर तिवारी, द्वारकादास सोनी, राजगोपाल अग्रवाल, रवी राठी, आशिष बाहेती, संजय पाटील, संतोष घाडगे, तुकाराम पाटील यांच्यासह सर्व विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२.३० ते ०३.३० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा, महाप्रसादाचा भाविक व भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानच्या वतीने करण्यात आले.
Comments