HOME   लातूर न्यूज

पालकमंत्र्यांच्या हस्ते पद्मभूषण डॉ. कुकडे यांचा सत्कार

जागतिक स्तरावर लातुरची नवी ओळख निर्माण होण्यास मदत


पालकमंत्र्यांच्या हस्ते पद्मभूषण डॉ. कुकडे यांचा सत्कार

लातूर: केंद्र शासनाने वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल डॉ. अशोक काका कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. त्यानिमित्त लातूर शहरातील जिल्हा सरकारी वकील मंडळ ॲड. संतोष देशपांडे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कामगार कल्याण, कौशल्य विकास,भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते डॉ. अशोक कुकडे व डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. जगन्नाथ चित्ताडे, ॲड. संतोष देशपांडे, ॲड. विश्वास जाधव, ॲड. चामले, आदी उपस्थित होते.
यावेळी पालकंत्री निलंगेकर म्हणाले की, मागील काही वर्षात टंचाईकडे आपल्या लातूर जिल्हयाची नकारात्मक ओळख निर्माण झालेली होती. डॉ. अशोक काका कुकडे यांच्या वैद्यकिय व सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला व यामुळे राज्य व जागतिक स्तरावर लातूरची सकारात्मक ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे. हा पुरस्कार म्हणजे डॉ. अशोक काका कुकडे यांच्या सेवाभावी वृत्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. कुकडे यांच्याकडे जिल्हा व राज्यस्तरीय अनेक समस्यांचे उत्तर असते व ते त्याबाबत मार्गदर्शनही करतात. त्यांचे जिल्हयाच्या वैद्दकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान ही मोठे असल्याचे श्री. निलंगेकर यांनी सांगून डॉ. कुकडे काका यांचे जिल्हा व राज्य व राष्ट्र हिताचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच पुढील कार्यासाठी निलंगेकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार डॉ. गायकवाड यांनी शासनाने डॉ. कुकडे यांच्या सामाजीक व वैद्यकीय क्षेत्रातील कामाची स्वत:हून दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केल्याची माहिती दिली. यावेळी ॲड. चित्ताडे यांनी ही मनोगत व्यक्त केले. कोणत्याही कामाच्या श्रेयाचं धनी होणे आपल्याला पटत नाही. जे काम माझ्या हातून घडून आले त्या प्रत्येक कामात माझे सहकारी, मित्र परिवार यांचे योगदान अत्यंत महत्वाचे असून त्यामुळेच हा पद्मभूषण प्राप्त झाल्याचं मत डॉ. कुकडे यांनी सत्काराला उत्तर देताना त्यक्त केले. माझ्यावर झालेल्या संस्कारामुळे समाजहिताची भावना जागृत राहीली व त्यामुळेच समाजहिताचे काम करु शकलो, असे ही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजित देशपांडे यांनी केले. सुत्रसंचालन ॲड. राजकुमार गिरवलकर यांनी केले तर आभार देशपांडे यांनी मानले.


Comments

Top