लातूर: आगामी निवडणूकीत लढाई जिंकण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रशिक्षीत झाले पाहिजेत. केंद्रसरकार व राज्य सरकारच्या फसव्या घोषणेला समर्थपणे उत्तर देवून सर्वांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण विकास करीत मागच्या पन्नास वर्षात काँग्रेसने चांगले कार्य केले. पण आता सत्तेवर असलेल्या भाजपाने फसव्या घोषणा केल्या त्यांचा पर्दाफाश येणाऱ्या निवडणूकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यानी करावा असे सांगत आगामी निवडणूकीत आपल्या विचारधारावरच समर्थपणे निवडणूक लढवणार असल्याचे राज्याचे काँग्रेस संवाद प्रशिक्षण मेळाव्याचे संयोजक तथा आमदार रामहरी रूपनवर यांनी येथे बोलताना सांगितले.
ते लातूर येथील विष्णूदास मंगल कार्यालयात सोमवारी शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सुसंवाद प्रशिक्षण कार्यक्रम शिबीरात उद्घाटन प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, युवानेते जिल्हा परिषद सदस्य धिरज विलासराव देशमुख, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सत्संग मुंडे, सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, भाई नगराळे, प्रशिक्षण प्रमुख नैशाद परमार, लेखा नायर, विनोद नायर, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व्ही.बी.बेद्रे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख, ॲड. बी.व्ही.मोतीपवळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार रुपनवर म्हणाले की मागल्या ५० वर्षात काँग्रेस सरकारने सर्वांना न्याय देण्याबरोबर देशाला प्रगती पथावर घेवून जाण्याचे काम केले आहे. आता सत्तेवर आलेल्या भाजपाने नुसत्या घोषणा दिल्या प्रत्यक्षात काहीच केले नाही हे आपल्याला लोकांत जावून सांगता आले पाहिजे यासाठी हे संवाद शिबीर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून या माध्यमातून काँग्रेस पदाधीकारी यांना बळ मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Comments