HOME   लातूर न्यूज

मोदी सरकारकडून शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विजय कोलते यांची टीका


मोदी सरकारकडून शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा

लातूर: केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारने नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी केलेली वार्षीक ०६ हजार रूपयांची तरतूद म्हणजे सरकारने शेतकर्‍यांची केलेली क्रूर चेष्टा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विजय कोलते यांनी केली. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारांशी बोलतांना ते पुढे म्हणाले, केंद्रात असलेले मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असून त्यांनी अनेक वेळा शेतकर्‍यांच्या विरोधात निर्णय घेतले आहेत. कालच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा होईल अशी अपेक्षा शेतकर्‍यांची होती मात्र त्यांनी वार्षीक सहा हजार रूपये म्हणजे दररोज १७ रूपये अनुदान जाहीर करून जणू शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठच चोळले आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चावर दीडपट भाव देवू अशी घोषणा सरकारने केली होती मात्र ती आजपर्यंत सत्यात उतरली नाही. कांद्याच्या एक किलो उत्पादनाला पाच रूपये जर खर्च येत असेल तर किमान सात ते आठ रूपये मिळतील अशी शेतकर्‍यांची अपेक्षा होती. मात्र सध्या कांदा दोन ते तीन रूपये किलो दराने विकला जात असल्याने शेतकरी पुर्णपणे नागवला जात असल्याचे कोलते म्हणाले.
२००८ साली केंद्रात असलेल्या तत्कालीन मनमोहन सरकारने पुर्णपणे कर्जमाफी जाहीर केल्याचे नमूद करून कोलते म्हणाले कांदा, ऊस, कापूस अशा पिकांना केंद्र सरकारने हमीभाव दिल्यास शेतकरी जिवंत राहू शकतो. तशी मागणी देखील सर्वच शेतकर्‍यांची आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ३३ टक्के मते मिळवून मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले. त्यावेळी विरोधी मतांची फाटाफूट झाली होती. आता उद्याच्या लोकसभा निवडणुकीत असे कांही होवू नये यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाआघाडीची मोट बांधत आहेत. त्यात ते नक्कीच यशस्वी होतील. काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नुक्तीच प्रियंका गांधी यांची निवड झाल्याविषयी बोलतांना ते म्हणाले, प्रियंका यांच्या आगमनामुळे सर्वच कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा मिळाले असून गांधी घराणे हे लोकशाहीच्या चौकटीत राहून काम करते. त्यामुळे त्यांच्यावर झालेली टीका निषेधार्ह आहे.


Comments

Top