लातूर: शासकीय अंध शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देत त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सदैव प्रयत्न करू. लातुरातील एकमेव असलेली अंध शाळा बंद होऊ देणार नाही. शाळेला मुख्यमंत्री निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार प्रसंगी सर्वांची साथ असेल तर शाळेचे पालकत्व स्वीकारू असे प्रतिपादन श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शैलेश भैय्या लाहोटी यांनी केले.
अत्रिवरद प्रतिष्ठान, लातूर व सावी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने लातूरच्या शासकीय अंध शाळेत अंधांसाठी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळा उदघाटन समारंभाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी शैलेश लाहोटी बोलत होते. कार्यशाळेचे उदघाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार पुण्यनगरीचे वरिष्ठ वॄत्त संपादक जयप्रकाश दगडे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेचे प्रशिक्षक स्वागत थोरात, सावी फौंडेशनचा अध्यक्षा रश्मी पांढरे, रवी सुडे, विणा ढोले, वनिता देशपांडे, सौरभ चौघुले, अत्रिवरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण शिवनगीकर, हरिश्चंद्र सुडे, सचिन चव्हाण आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
उदघाटक म्हणून बोलताना जयप्रकाश दगडे म्हणाले की फेसबुक, व्हाट्सअप या सोशल मीडियामुळे सामाजिक चळवळी मध्ये काम करणारी तरुण पिढी हल्लीच्या काळात दिसत नाही. अत्रिवरद प्रतिष्ठान च्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येऊन अंधांसाठी कार्यशाळा आयोजित केली ही बाब आजच्या काळात कौतुकास्पद आहे. अंधांचा वेदना काय असतात या त्यांनाच माहीत ते जीवनातील अनेक आव्हानांना तोंड देत जगतात.प्रतिष्ठानचा माध्यमातून अंधांबाबत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य तरुणांचा माध्यमातून केली जात आहे.
कार्यशाळेचे प्रशिक्षक स्वागत थोरात यांनी पांढऱ्या काठीचा इतिहास सांगून त्याचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण अनेक मनोरंजनात्मक खेळाचा माध्यमातून सहभागी प्रशिक्षणार्थींना दिले. कार्यशाळेचे प्रास्ताविक अत्रिवरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण शिवनगीकर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा विनोद चव्हाण यांनी केले. तर शेवटी आभार जयकिरण परदेशी यांनी मानले. कार्यशाळेचा यशस्वीतेसाठी आशिद बनसोडे, अनिल कांबळे, योगेश कुलकर्णी, प्रणव शिवनगीकर, संतोष बेंबलकर, गणेश शहाबादे, विकी कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
Comments