HOME   लातूर न्यूज

ग्रामीण भागातील पोलिसांना मिळणार सरकारी निवारा

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा २५० निवासस्थानांसाठी ८५ कोटींची तरतूद


ग्रामीण भागातील पोलिसांना मिळणार सरकारी निवारा

लातूर: कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारीस पायबंद घालणारे पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत होते, तरीही आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणार्‍या ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्यामुळे शासकीय निवारा मिळणार आहे. जिल्ह्यातील औसा, निलंगा, किल्लारी, भादा व कासारशिरसी पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असणार्‍यांसाठी २५० निवासस्थानाकरीता ८५ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले कर्तव्य पार पाडणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना शासकीय निवारा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे होते. मात्र १९६३ पासून ग्रामीण भागातील पोलीसांठी शासकीय वसाहत उभारण्याकरीता निधीची तरतूद झालेली नव्हती. लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, किल्लारी, भादा व कासारशिरसी या ग्रामीण भागात असलेल्या पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना शासकीय निवारा मिळावा याकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता.
पालकमंत्री निलंगेकर यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश मिळालेले असून 1963 नंतर प्रथमच जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना आता शासकीय निवारा मिळणार आहे. औसा, निलंगा, किल्लारी, भादा व कासारशिरसी या पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या २५० निवासस्थानांसाठी ८५ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद झालेली आहे. या आर्थिक तरतुदीमुळे आता ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना लवकरच शासकीय निवारा उपलब्ध होणार आहे. सदर निधीची तरतूद केल्याबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त केलेले आहेत. लवकरच जिल्ह्यातील उर्वरित ग्रामीण भागात असलेल्या पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी शासकीय निवासस्थाने उभारण्यात येतील अशी ग्वाही पालकमंत्री निलंगेकर यांनी दिलेली आहे.


Comments

Top