HOME   लातूर न्यूज

रेल्वे कोच प्रकल्पाचे काम गतिमान; वर्षाखेर उत्पादन

२०० कोटी मंजूर आजवर १२० कोटींचा खर्च


रेल्वे कोच प्रकल्पाचे काम गतिमान; वर्षाखेर उत्पादन

लातूर: केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल व राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन विशेष लक्ष दिल्यानेच लातूर येथे मंजूर झालेल्या मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पाचे काम आज गतीने सुरू आहे. वर्षाखेर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून यामुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील बेरोजगारी दूर होण्यास मदत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक झोनल रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी दिली .
प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर माहिती देताना निजाम शेख म्हणाले की, लातूरकरांच्या ध्यानीमनी नसताना रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यामुळे हा प्रकल्प लातूरला मिळाला. केवळ प्रकल्पाची घोषणा करून सरकार थांबले नाही तर अवघ्या काही महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. आज प्रकल्पस्थळी गतीने काम सुरू आहे. वर्षाखेर या प्रकल्पातून पहिला कोच बाहेर काढण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने काम केले जात आहे.
हा प्रकल्प ५०० कोटी रुपयांचा असून नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात त्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत अंदाजे १२० कोटी रुपये खर्च झाला आहे. गरजेनुसार आणखीही निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यानी दिले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला कसलीही अडचण येणार नसल्याचे शेख म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारने मराठवाडा आणि लातूरसाठी हा प्रकल्प मंजूर केला. बेरोजगारी दूर करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या हजारो युवकांना या प्रकल्पामुळे रोजगार मिळणार आहे. आज प्रकल्पाच्या कामाची गती पाहता देशपातळीवर सर्वात कमी कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचेही निजाम शेख यांनी सांगितले. यावेळी अभियंता महम्मद शारीक, भाजपा युवा मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रसेन रेड्डी, दत्ता सुरवसे, समद शेख यांच्यासह रेल्वेचे अभियंते उपस्थित होते.


Comments

Top