लातूर: जिल्हा युवा सेनेच्यावतीने लातूरात ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा तसेच शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा घेण्यात आला. अत्यंत कठीण परिस्थितीत जेष्ट शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही असे प्रतिपादन यावेळी माजी आमदार दिनकर माने यांनी व्यक्त केले.
येथील भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास युवासेनेचे सहसचिव प्रा. सुरज दामरे, अॅड. बळवंत जाधव, अभय साळुंके, सुनिता चाळक, जिल्हा युवा अधिकारी अॅड. श्रीनिवास उर्फ राहूल मातोळकर, कुलदीप सुर्यवंशी यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आमदार दिनकर माने यांनी सांगीतले की, सर्व सत्तास्थाने प्रस्थापितांच्या हातात असताना, कठीण परिस्थितीमध्ये शिवसेनेची धुरा सांभाळणार्या ज्येष्ठ शिवसैनिकांचे योगदान कुणालाही विसरता येणार नाही.
शिवसेना नसती तर मी कधीच आमदार झालो नसतो. काँग्रेसमध्ये सतरंजी उचलण्याचेच काम करावे लागले असते. सर्व सामान्य माणसाला लोकप्रतिनिधी बनवण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले आहे. काम करणार्या माणसाला शिवसेनेत १०० टक्के न्याय मिळतोच. हिंदूत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. शिवसेनाप्रमुखांचा खरा वारसा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जोपासला आहे. त्यामुळेच पहले राम मंदिर फिर सरकार अशी घोषणा त्यांनी दिली. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना ठाम आहे. शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नाही. पदावर काम करणार्यांनी स्वतः आत्मपरिक्षण करावे, वॉटसअप, फेसबुकवरच काम करणारे नकोत तर प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे शिवसैनिक हवे आहेत. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये का अपयश आले याचे आत्मचिंतन करुन नव्याने पक्ष उभारणीचे काम करा असेही यावेळी दिनकर माने यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. श्रीनिवास मातोळकर यांनी केले. यावेळी अभय साळुंके, अॅड. बळवंत जाधव, सुनिता चाळक, गोपाळ माने यांनी मनोगत व्यक्त केले.
Comments