लातूर: लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना व प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी लातुरात ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीचे उद्घाटन परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक गोविंद पवार, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक उदय पाटील, यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. ही रॅली लातूर शहरातील टाऊन हॉल मैदानापासून काढण्यात आली. टाऊन हॉल मैदानावरून निघालेली ही रॅली अशोक हॉटेल, शिवाजी चौक, बार्शी रोड मार्गे पीव्हीआर चौकापर्यंत व तेथून परत शिवाजी चौक अशी काढण्यात आली. रॅलीत सुरक्षेचे महत्व विशद करणारे बॅनर लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांची सुरक्षा हेच आमचे ध्येय हे ब्रीद घेऊन चालणारी विद्यार्थी वाहतूक संघटना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेस प्राधान्य देण्याचे काम अग्रक्रमाने करते. यावेळी लातूर जिलज विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पांडे, सचिव संदीप वाघ, सहसचिव गोविंद पाटील, कोषाध्यक्ष सुरेंद्र सरवदे, जिल्हाध्यक्ष विनोद करकिले, शहराध्यक्ष सतीश भाकरे यांसह संघटनेचे सर्व परवानाधारक सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments