लातूर: जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी तसेच लातूर शहरातील डॉक्टर्स, इंजिनिअर्स व इतर मान्यवर व्यक्तींसाठी हा ऑफिसर्स क्लब सुरु करण्यात येत आहे. यामध्ये विविध प्रकारच्या सर्व अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या जाणार असून क्लबची वास्तू अत्यंत देखणी असून ही निर्माण झाल्यास लातूर शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे कामगार कल्याण,कौशल्य विकास,भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री श्री.संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूच्या परिसरात ऑफिसर्स क्लब बांधकामाच्या भूमीपूजन प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी लातूर शहराचे आमदार अमित देशमुख, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर,प्रविक्षाधिन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. ऑफिसर्स क्लबमध्ये सर्व क्रीडा प्रकारांच्या सुविधा तसेच मनोरंजनाच्या सुविधा मिळणार असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना आलेल्या कामाचा ताण येथे कमी होईल तसेच कामाची गुणवत्तेत वाढ होईल, असे आमदार श्री. देशमुख यांनी सांगून हया इमारतीच्या कामाबद्दल प्रशासनाला शुभेच्छा दिल्या. ऑफिसर्स क्लबच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व अद्यावत क्रीडा सुविधा लातूरकरांसाठी उपलब्ध् करुन दिल्या जात आहेत. तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांना ही कामांचा ताणातून मुक्तता मिळण्यासाठी हा क्लब नक्कीच लाभदायक ठरेल, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. त्याप्रमाणेच समाज व शासन एकत्रित येऊन शहराच्या सर्वांगीण विकास घडवून आणला जाईल, असे त्यांनी सांगितले. या क्लबचे जवळपास 125 मेंबर झाले असून समाजातील जास्तीत जास्त मान्यवर व्यक्तींनी क्ल्बचे सदस्यत्व स्वीकारावे यासाठी लाईफ टाईम मेंबरशीपची रक्कम पाच लाखाहून तीन लाख करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगून हया क्लबचे काम १० महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती दिली. प्रारंभी पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते व आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये ऑफिसर्स क्लब बांधकामाचे भूमीपूजन विधीवत पध्दतीने करण्यात आले. त्यानंतर इमारतीच्या नामफलकाचे अनावरण ही झाले या कार्यक्रमास उपस्थितांचे आभार क्लबचे सचिव तथा निवासी
उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी मानले.
Comments