लातूर: येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात जिर्णोद्धार व मुर्ती पुन:प्राणप्रतिष्ठापना महोत्सवात रामायणाचार्य हभप रामराव ढोक महाराज यांची ०८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या श्रीरामकथेचा १४ फेब्रुवारी रोजी दुपारी मंगलमय वातावरणात समारोप झाला. याप्रसंगी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन तथा कथेच्या मुख्य यजमान श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कथेच्या समारोपात बोलताना रामराव ढोक महाराज म्हणाले की, रामराज्य शस्त्रातून नव्हे तर शास्त्रातून जन्माला येते. या कथेसाठी देशमुख परिवार, देवस्थानचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, कार्यकर्ते, भक्त-भाविक संयोजन समितीचे सदस्य, भाविक-भक्त या सर्वांच्या सहकार्यातून हा रामकथेचा यज्ञ सफल झाल्याचे त्यांनी सांगितले. लोकनेते विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, आर.आर. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाल्याचे महाराज म्हणाले. विलासरावांच्या अनेक अठवणींना त्यांनी उजाळा दिला.
याप्रसंगी बोलताना वैशालीताई विलासराव देशमुख यांनी या श्रीराम कथेचे यजमानपद मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कथेला दररोज उपस्थित राहता आले नाही. पण, पहिल्या आणि समारोपाला हजर राहता आले, हे माझे भाग्यच आहे. गेल्या सात दिवसांपासून भाविकांनी या कथेचे श्रवण केले. त्यांना ज्ञान मिळाले, चांगले विचार ऐकायला मिळाले. त्याचा उपयोग करून त्यांनी आपल्या घरात रामराज्य आणावे, असे आवाहन केले.
यावेळी श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, सचिव विनोद अग्रवाल, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कांताप्रसाद राठी, प्रकाश कासट, लक्ष्मीनिवास अग्रवाल, पांडुरंग मुंदडा, कमलकिशोर अग्रवाल, चंदू लड्डा, द्वारकादास सोनी, रामनुज रांदड, संतोष गिल्डा, रामेश्वर तिवारी, गोविंद पारीख, रमेश भुतडा, शांतेश्वर बरबडे, सुरेश मालू, बालाप्रसाद बिदादा यांच्यासह देवस्थानचे सर्व विश्वस्त, सदस्य, भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिता मालू व लक्ष्मीकांत सोनी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. देवस्थानचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी यांनी आभार मानले. शुक्रवारी सकाळी हभप संजय महाराज कानेगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर दुपारी. १२.३० ते ०३.३० या वेळेत महाप्रसादाचे वितरण होईल. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments