लातूर: गावभागातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरचा जिर्णोद्धार व पुन:प्राणप्रतिष्ठापना महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात श्री व्यंकटेश बालाजी मंदिरावर कलशारोहण सोहळा मोठ्या थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, सचिव विनोद अग्रवाल, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कांताप्रसाद राठी, राजगोपाल अग्रवाल, सर्व विश्वस्त, पदाधिकारी, भाविक -भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलशारोहणाची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर महाराजांच्या हस्ते हा कलशारोहण सोहळा थाटात पार पडला. त्याचबरोबर या महोत्सवात गुरूवारी नित्य आराधना, ध्वजकुंभ, देवतापूजन, कुंभमंडल, बिंब अग्नी आराधना, हवन, कलश अभिषेक तत्वसृष्टी हवन, प्राणप्रतिष्ठा हवन आदी धार्मिक उत्सव तिरूमल्ला तिरूपती बालाजीच्या धरतीवर पार पडले. शुक्रवार हा महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. दिवसभर दैनंदिन विधी संपन्न होतील. दुपारी १२.३० ते ०३.३० या वेळेत महाप्रसादाचे वितरण होईल व सायंकाळी ०४.३० वाजता कल्याण उत्सव होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविक-भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments