HOME   लातूर न्यूज

सोयाबीनची बेकायदा आयात थांबणार

पाशा पटेल यांच्या निवेदनानंतर केंद्र सरकारचे कार्यवाहीचे निर्देश


सोयाबीनची बेकायदा आयात थांबणार

लातूर: देशातील सोयाबीनचे दर वाढल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी परदेशातून बेकायदेशीरपणे सोयाबीनची आयात सुरू केली होती. यामुळे बाजारपेठेत सोयाबीनचे दर काही प्रमाणात कमी झाले. यासंदर्भात FSSAI च्या चेअरमन रिता तेवतिया यांना माहिती दिल्यानंतर केंद्रशासनाने दोन दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. पाशा पटेल म्हणाले की, केंद्र सरकारने खाद्य तेलावर आयातशुल्क वाढवले. सोयाबीन पेंडीवर १० टक्के निर्यात अनुदान दिले. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोयाबीनचा दर ३८०० ते ३९०० रुपयांपर्यंत पोहोचला. वाढलेले हे दर पाहता काही व्यापाऱ्यांनी आफ्रिकन राष्ट्रातून ३५०० रुपये प्रति क्विंटल या दराने जी एम सोयाबीन आयात करण्यास प्रारंभ केला.
३५०० रुपयात हे सोयाबीन भारतात दाखल होत आहे. यामुळे बाजारपेठेत सोयाबीनचे दर काही प्रमाणात कमी होत आहेत. मुळात भारत सरकारने जी एम सोयाबीनला परवानगी दिलेली नाही. परदेशातून येणारे सोयाबीन हे जी एम सोयाबीन आहे. ज्याला बंदी आहे ते सोयाबीन शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून आयात केले जात आहे.
ही बाब लक्षात आल्यानंतर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी फूड सेफ्टी स्टॅंडर्ड ॲक्ट ऑफ इंडिया च्या चेअरमन रिता तेवतिया यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांना सविस्तर निवेदन दिले. बेकायदेशीरपणे होणाऱ्या या आयातीवर बंधन आणावे, शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली. त्यावरून यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश तेवतिया यांनी दिले. परदेशातून होणारी बेकायदेशीर आयात थांबल्यानंतर पुन्हा एकदा सोयाबीनचे दर वाढतील असेही ते म्हणाले.


Comments

Top