लातूर: लातूर जिल्हयात कोणाचाही ऊस गाळपा अभावी शिल्लक राहणार नाही. संपूर्ण ऊसाचे गाळप होई पर्यंत मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने सुरू राहाणार आहेत. यामुळे सभासद व बीगर सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून अन्य कारखान्यांना ऊस देऊ नये, पाणी नसल्यामुळे ऊस वाळत आहे याची जाणीव आहे. बाहेरच्या कारखान्याला ऊस दिल्यास भावात तफावत असल्याने इतरत्र ऊसाची विल्हेवाट लावल्यामुळे शेतकर्यांचेच नुकसान होणार आहे. मांजरा परिवारातील सर्वच कारखाने दुपटीपेक्षा अधिक क्षमतेने ऊसाचे गाळप करीत आहेत. यामुळे मार्च आखेरपर्यंत सर्व ऊसाचे गाळप होणे शक्य आहे. तरी आपला ऊस मांजरा परिवातील कारखान्यांनाच द्यावा, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी सभासद, बीगर सभासद ऊसउत्पादकांना केले आहे.
मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्याचे गळीत हंगाम यावर्षी लवकर सुरू झाले आहेत. हंगामाच्या पहिल्या दिवसापासून क्षमतेपेक्षा दुपटीहून अधिक गाळप सर्व कारखान्याचे सुरू आहे. या हंगामात कार्यक्षेत्रातील ऊसालाच प्राधान्य देवून गळीत हंगाम सुरू आहेत. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना (ऊस गाळप 4 लाख 81 हजार मे.टन), रेणा कारखाना (ऊस गाळप 3 लाख 33 हजार मे.टन), विलास सहकारी साखर कारखान्याचे (ऊस गाळप 4 लाख 30 हजार मे.टन), विलास कारखाना युनीट -2 (ऊस गाळप 2 लाख 72 हजार मे.टन), जागृती कारखाना (ऊस गाळप 3 लाख 79 हजार मे.टन) ऊस गाळप केले आहे.
लातूर जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र अधिक होते यामधील ६० टक्के ऊसाची लागवड ही ऑक्टोबर नोव्हेंबरची आहे. तसेच यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने ऊस वाळत आहे. काही ठिकाणी तर ऊस जळीताच्या घटना घडत आहेत. ग्रामीण भागातील सर्व रस्ते अत्यंत खराब झालेले असून त्याची दुरूस्ती देखील झाली नाही याचा परिणाम कारखान्याच्या ऊस तोडणी कार्यक्रमावर होत आहे.
मांजरा परिवारातील कारखान्यांच्या सभासद, बिगर सभासद ऊस उत्पादकांनी काळजीपोटी अन्य कारखान्यांना ऊस देऊन किंवा इतरत्र ऊसाची विल्हेवाट करू नये, असे केल्याने आपले आर्थिक नुकसान होईल. लातूर जिल्हयात गाळपा अभावी ऊस शिल्लक राहणार नाही. जिल्हयातील संपूर्ण ऊसाचे गाळप केल्याशिवाय मांजरा परिवारातील कोणताही कारखाना बंद होणार नाही. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसाचे संपूर्ण गाळप मार्च अखेर पर्यंत करण्याचे काटेकोर नियोजन संबंधित कारखान्याकडून करण्यात येत आहे. या परिस्थितीचा विचार करून सभासद व बिगर सभासद ऊसउत्पादकांनी मांजरा परिवारातील साखर कारखान्यानाच आपला ऊस गळीतास दयावा, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
Comments