लातूर : पुलवामा येथे दहशतवाद्यानी हल्ला केल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले पाहिजे, पाकिस्तान सोबत युद्ध केले पाहिजे, अशी वक्तव्य काहीजण करीत आहेत. परंतु युद्धाची खुमखुमी देशाच्या प्रगतीला घातक असते. युद्ध करणे सोपे नाही, असे मत निकम यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श नवरत्न पुरस्कारांचे वितरण राज्य शासनाचे विशेष सरकारी वकील पद्मश्री ऊज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ९ जणांना आदर्श रत्न पुरस्कार देऊन या सोहळ्यात गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अॅड. त्र्यंबकदास झंवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अशोक ढवण, मुख्य सत्कार मूर्ती बीबी ठोंबरे यांच्यासह आदर्श मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमात बी. बी. ठोंबरे यांना आदर्श उद्योग रत्न, सुधाकर बावकर यांना आदर्श शौर्य रत्न अॅड. उदय गवारे यांना आदर्श कायदा रत्न, सौ राजश्री पाटील यांना आदर्श नारी रत्न, तृप्ती अंधारे यांना आदर्श प्रशासन रत्न, मधुकर चिद्रे यांना आदर्श कृषी रत्न, मकरंद जाधव यांना आदर्श समाज रत्न, शशिकांत पाटील यांना आदर्श पत्रकार रत्न आणि प्रमोद कुर्लेकर यांना आदर्श कला रत्न पुरस्कार देऊन अॅड. उज्वल निकम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना उज्वल निकम म्हणाले की, जगात प्रामाणिक माणसे आहेत पण अनेकदा प्रामाणिकपणाचा अहंकार असतो. मनात अहंकार असल्यास पाय जमिनीवर राहत नाहीत. आदर्श मैत्री फाऊंडेशनने समाजातील चांगली आणि गुणवान माणसे शोधून त्यांना पुरस्कार दिले. माझ्या हस्ते या रत्नांचा सत्कार झाला. त्यामुळे मी भाग्यवान असल्याचे ते म्हणाले.
आ विक्रम काळे म्हणाले की, मधुकर अप्पा चिद्रे यांच्यासारख्या माणसांना शासनाने शेतीसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त केले पाहिजे. खेड्यातील माणसे शिकलेल्या माणसापेक्षा शहाणी असतात. आमचा शेती व्यवसाय आजही उद्योजक निर्माण करू शकत नसल्याची खंत कुलगुरू डॉ ढवण यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात ॲड. झंवर यांनी समाज हा जगन्नाथाचा रथ असून त्याची चाके ओढण्यासाठी चांगली माणसे आवश्यक आहेत. आदर्श मैत्री फाऊंडेशनने अशी चांगली माणसे शोधल्याचे ते म्हणाले. बीबी ठोंबरे यांनी सर्वांच्या वतीने पुरस्काराला उत्तर दिले. बिराजदार , तुकाराम पाटील, उत्तम देशमाने, शिवराज मोटेगावकर, संगमेश्वर बोमणे, अविनाश सातपुते, शिवाजी हांडे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. फाऊंडेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गोडसे पाटील, बीड जिल्हाध्यक्ष संतोष मोहिते, नांदेड जिल्हाध्यक्ष शाम जाधव, यांचाही सत्कार करण्यात आला. फाऊंडेशनच्या वतीने उज्वल निकम यांचा नागरी सत्कार करण्यात आला. संतोष बिराजदार यांचाही यावेळी सहकाऱ्यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे संचलन विवेक सौताडेकर तर आभार प्रदर्शन चंद्रकांत कातळे यांनी केले.
Comments