HOME   लातूर न्यूज

मनपाच्या भाडेवाढीबाबत आ. देशमुख साधणार संवाद

आज रात्री आठ वाजता गांधी मार्केटला होणार कार्यक्रम, २० फेब्रुवारी रोजी मोर्चा


मनपाच्या भाडेवाढीबाबत आ. देशमुख साधणार संवाद

लातूर: लातूर शहर महानगरपालिकेने दुकानांचे भाडे जवळपास १० ते २० पट वाढविले आहेत. तसेच मालमत्ता करातही भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य जनतेवर होणाऱ्या या अन्यायाच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लातूरकरांसोबत असून याच संदर्भात सोमवार १८ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता गांधी मार्केट या ठिकाणी माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख मनपा गाळेधारकांशी सुसंवाद साधणार आहेत, अशी माहिती मनपाचे माजी स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी दिली.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अशोक गोविंदपूरकर यांनी पुढे असे नमूद केले आहे की, लातूर शहर मनपाने नुकताच एक ठराव करून त्यात शहरातील मनपाच्या मालकीच्या २००० गाळ्यांचे भाडे १० ते २० पट वाढविले आहे. याचा बैठकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक रेडिरेकनर नुसार भाडेवाढ करावी, मात्र गाळ्यांच्या बांधकामांचा ३० ते ४० वर्षांचा घसारा गृहीत धरून भाडेवाढ करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करीत होते. मात्र सत्ताधारी नगरसेवकांनी मांडलेल्या ठरावासह चालू वर्षाचा रेडिरेकनर व घसाराच नाही, असा ठराव मंजूर करून केल्याने मोठ्या प्रमाणात भाडेवाढ आकारली जाणार आहे. या ठरावाप्रमाणे मनपा आयुक्तांना कार्यवाही करून भाडेवाढ करण्यास भाग पाडले जात आहे. या भाडेवाढीमुळे व्यापारीवर्गात मोठी नाराजी आहे. तसेच एमआयडीसी व मार्केट यार्डामधील उद्योजक-व्यापारी वर्गालाही मागील वर्षांपासून मालमत्ता कर लावण्यात आला आहे, त्याचाही व्यापार-उद्योगावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. केवळ एवढेच नव्हे तर मनपाच्या मालमत्ता कर वाढीसंदर्भात आ. अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे अपिल केले आहे. त्यात महाराष्ट्र शिक्षण कर व रोजगार हमीच्या दराचे पुनर्मुल्यांकन करावे, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. तसेच स्वच्छता आकाराचाही ठराव घ्यावा मागणी आहे. आजघडीला एकूण ७४ कोटी मालमत्ता करापैकी जवळपास ३२ कोटी रुपये वरील तीन कराचे आहेत, जे की सरळ राज्य सरकारचे कर आहेत, परंतु त्याचा ठराव मनपा करीत नाही. हे विषय जनतेच्या जिव्हाळ्याचे असल्यामुळे सोमवार, १८ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री आठ वाजता गांधी मार्केटमध्ये आ. अमित देशमुख या विषयांवर मनपा गाळेधारकांशी सुसंवाद साधणार आहेत. तसेच याच विषयाला अनुसरून बुधवार २० फेब्रुवारी २०१९ रोजी मनपा गाळेधारक व जनतेच्या वतीने गंज गोलाई ते मनपा कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या सुसंवाद कार्यक्रम व मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अन्यायाला वाचा फोडावी, असे आवाहन या पत्रकान्वये कोंग्रेसचे शहराध्यक्ष मोईज शेख, विरोधी पक्षनेता दीपक सूळ, स्थायी समितीचे माजी सभापती अशोक गोविंदपूरकर, रवीशंकर जाधव, विक्रांत गोजमगुंडे, व्यंकटेश पुरी आदिंनी केले आहे.


Comments

Top