लातूर: पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे .समाजात व शासनात घडणाऱ्या बऱ्या - वाईट गोष्टींवर अंकुश ठेवणारा हा स्तंभ आहे . म्हणून पत्रकारानी स्वतंत्र बाणा राखला पाहिजे , असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी केले. लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून अभिमन्यू पवार बोलत होते. या कार्यक्रमास राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, माहिती व जनसंपर्क विभागाचे सहसंचालक यशवंत भंडारे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सचिव अनिल महाजन, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, सचिव सचिन मिटकरी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
अभिमन्यू पवार म्हणाले की, पत्रकारिता हा छंद आहे, तो जोपासला तर त्यातून चांगले पत्रकार घडू शकतात. पत्रकारांच्या लेखणीत खूप मोठी ताकद आहे. लेखणीच्या या ताकदीच्या माध्यमातून कुठल्याही क्षेत्रात परिवर्तन घडू शकते, असे ते म्हणाले. पत्रकारितेच्या क्षेत्रात आज अनेक आव्हाने आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यानंतरही प्रिंट मीडियावरील विश्वास कायम आहे. प्रिंट मीडियावर यामुळे मोठी जबाबदारी आली आहे. माझ्या राजकीय जडणघडणीत पत्रकारांचा मोठा वाटा आहे. आज सर्व पत्रकार राज्य शासनाचे कौतुक करीत आहेत. त्यामुळे आमचे सरकार पुन्हा येणार असल्याची खात्री झाली, असेही पवार म्हणाले. संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे यांनी प्रास्ताविक केले. अनिल महाजन, यशवंत भंडारे, यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मुर्गाप्पा खुमसे, रामराव गोरे, झटिंग म्हेत्रे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
Comments