लातूर: या वर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कारखान्याचे खरे मालक शेतकरी सभासद असतानाही हे हक्काचे कुठे जाणार, यांना आमच्या शिवाय पर्याय नाही, अशी भूमिका घेऊन गेटकेनचा ऊस आणला जात आहे. आम्ही कधीच द्वेषभावनेतून राजकारण केलं नाही. तेव्हा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याची जाणीवपूर्वक होणारी अडवणूक आणि पिळवणूक कदापि खपवून घेणार नाही असा इशारा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निवळी येथील कार्यक्रमातून बोलताना दिला.
लातूर तालुक्यातील मौजे निवळी येथे पाणीपुरवठ्याची राष्ट्रीय पेयजल योजना, रस्ता डांबरीकरण, तलाव दुरुस्ती, निळकंठेश्वर मंदिर सभामंडप, तांडा वस्ती सुधार योजना, सौर पंप यासह पाच कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या श्रीमती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेतील दत्तक घेतलेल्या कुटुंबांना आरोग्य सुरक्षा योजनेचे कार्ड वितरण रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री निलंगेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव जाधव हे होते. तर याप्रसंगी लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, जिपचे सभापती प्रकाश देशमुख, संजय दोरवे, संगीताताई घुले, रेणापूर पसचे सभापती अनिल भिसे, संगायोचे लातूर तालुकाध्यक्ष साहेबराव मुळे, निवळी जिल्हा परिषद सदस्या प्रिती शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष विजय काळे आदिची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, राज्यात सर्वात कमी पाऊस असलेल्या पाच जिल्ह्यात लातूर असून सर्वाधिक कारखाने असणाऱ्या पाच जिल्ह्यात लातूर जिल्हाच आघाडीवर आहे. पुढच्या पिढीचा विचार करून नियोजन करायला हवे होते मात्र केले नाही. या भागाने मोठं केलं, निवळी गावाने खूप काही दिलं. त्या गावाला सांभाळण्याऐवजी आज पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तुमच्या हक्काचे पाणी कुठे गेलं असा सवाल उपस्थित केला तेव्हा जनतेतून कारखान्याला असा एकच आवाज आला. तेव्हा कारखाना उभा करताना पाण्याचे नियोजन का केले नाही असा प्रश्न त्यांनी केला.
यावेळी बोलताना लातूर ग्रामीण भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड म्हणाले, देशात, राज्यात आणि जिल्ह्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर लातूर तालुक्यात शेकडो कोटींची कामे चालू आहेत. या विकास कामांमुळे काँग्रेसच्या पोटात दुखू लागले आहे. काहीजण जाणीपूर्वक कामात आडवा आडवीचे काम करीत आहेत. मात्र ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी हे विसरून चालणार नाही. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आज तीन-तीन महिने काही जणांना गायब व्हावे लागते. भविष्यात ते कायमचे गायब होतील.
ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने हजारो कुटुंबांना दत्तक घेतले असून प्रत्येक आजारावर मोफत उपचार केला जाणार आहे. आजाराने त्रस्त असलेल्या गोरगरीब जनतेनी उपचारासाठी यावे आम्ही त्यांना उपचार करून हसत पाठवू असे सांगून रमेशअप्पा कराड म्हणाले की, आम्ही मतासाठी काहीही करत नाही. ज्या भागात जन्मलो, वाढलो त्या भागाचे आपणास काही देणे लागते. या भावनेतून ही आरोग्य सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे त्यांनी सांगीतले.
Comments