लातूर: गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्यातील भाजपा सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे. अघोषीत आणीबाणी लावून जनतेचे हक्क आणि अधिकार काढून घेतले जात आहेत. त्यामुळे आता या सरकारची हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी काँग्रेसजनांनी सज्ज व्हावे, असे आवाहन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले. ते लातूर काँग्रेस भवन येथे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरातील विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण कार्यक्रम २४ फेब्रुवारी २०१९ रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या पुर्वतयारीसाठी १८ फेब्रुवारी रोजी काँग्रेस भवन येथे आयोजित बैठकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते.
यावेळी आमदार ॲड. त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. व्यंकट बे्द्रे, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, जिल्हा परिषदेचे सदस्य धिरज विलासराव देशमुख, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन एस.आर.देशमुख, पंचायत समितीच्या सभापती शितल फुटाणे, मनपातील विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, ॲड. समद पटेल, हरिराम कुलकर्णी, पृथ्विराज शिरसाट, रफीक सय्यद, ॲड. फारूख शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यास लोकसभेतील विरोध पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, देशाचे भुतपूर्व गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. असे नमूद करून माजी मंत्री दिलीपराव देशमुख पुढे म्हणाले की, या समारंभास काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या सर्व घटकांनी उपस्थित राहावे. कारखाना स्थळावरील साडेचार एकरमध्ये पहिल्या टप्प्यात विकासरत्न विलासराव देशमुख यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात सभागृह, प्रशिक्षण केंद्र उभे करून प्रेरणास्थळ निर्माण केले जाणार आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण निमित्ताने होणारी सभा ही उद्याच्या, लोकसभेची नांदी ठरेल. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, व नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे त्यांनी आवाहन केले.
Comments