लातूर: आपले जीवन सुखी, समृध्द करण्यासाठी माणसाने स्वतःला मोह, अहंकारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा, असे प्रतिपादन शतायुषी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले. लातूर शहरातील राजर्षी शाहू उद्यान, शाहूनगर, विवेकानंद चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्संग सोहळ्यात उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या सत्संग सोहळ्याच्या संयोजक डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग मंडळाच्या प्रमुख सौ. लताताई मुद्दे या होत्या. तर आयोजक महेश यशवंतराव तत्तापूरे, कैलास तत्तापूरे, शैलेश तत्तापूरे, उमाकांत बापूराव तत्तापूरे, सूर्यकांत त्र्यंबकराव तत्तापूरे, ओमप्रकाश भीमराव तत्तापूरे, शशिकांत बळवंतराव तत्तापूरे, सौ. सुमन यशवंतराव तत्तापूरे व समस्त तत्तापूरे परिवार हे होते. या सत्संग सोहळ्याचे आयोजन डॉ. यशवंतराव ग्यानोबा तत्तापूरे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. आपल्या आशिर्वचनात डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज पुढे म्हणाले की, आजच्या कलियुगात नामाला, नामस्मरणाला फार महत्व आहे. नाम आणि रूप हे अगदी जगाच्या आरंभापासून चालत आलेले आहे. आजच्या घडीला मनुष्य प्राणी मोह-मायेच्या जाळात गुरफटलेला पाहावयास मिळतो. मनुष्याला अज्ञानरूपी अंधकारात घेऊन जाण्याचे काम माया करत असते. अहंकार हे मायेचेच स्वरूप आहे. घर-परिवार, सोने-नाणे, पैसा-अडका मुले-बाळे हे प्रापंचिक मायेचे प्रकार आहेत. मानवी जीवनात सुख-दुःखाचे भोग हे माणसाला अटळ असतात. आपआपल्या कर्म, प्रारब्धाप्रमाणे माणसाला ते भोगणे क्रमप्राप्त असते. संसारिक जीवनात व्यावहारिक ज्ञानाला अनन्यसाधारण असे महत्व असते. आपली नित्यकर्मे करताना प्रत्येकाने आपले अस्तित्व ओळखण्याचा प्रयत्न करायला हवा. या विश्वात विश्वालाही नियंत्रित करणारी अतींद्रिय शक्ती चैतन्य रूपाने कार्यरत असते. मानवी जीवनात आत्मचिंतनासाठी प्रत्येकाने थोडाफार वेळ काढलाच पाहिजे. जीवनात भगवंताच्या नामस्मरणास अनन्यसाधारण असे महत्व असते. ईश्वराच्या भक्तीशिवाय जीवनाला कांहीच अर्थ नाही. शिवायनमः च्या जपात एवढी मोठी शक्ती आहे की,त्याचा अंदाज लावणे सहज सोपे काम नाही. माणसाला राग, वाईट विचारांपासून दूर ठेवण्यासाठीही नामस्मरण आवश्यक असल्याचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी सांगितले.
Comments