लातूर : गेली पाच वर्षे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अराजकता माजवून देशाला नाजूक वळणावर आणून सोडले आहे़. त्यामुळे संपूर्ण देशभर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत़. परिवर्तनास आता केवळ दोन दिवस राहिले असून युवकांसोबत सर्वांनीच भाजपाला शेवटचा जोरदार झटका द्यावा, असे आवाहन माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले़.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (कवाडे), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (गवई) महाआघाडीचे लातूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार मच्छिंद्र कामंत यांच्या प्रचारार्थ लातूर युवक काँग्रेस व 'एनएसयुआय'च्या वतीने औसा रोडवरील थोरमोटे लॉन्स येथे आयोजित युवक मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते़. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आमदार ॲड़ त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड़. विक्रम हिप्परकर, जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष लालासाहेब चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवक शाखेचे जिल्हाध्यक्ष महारुद्र चौंडे, जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, जिल्हा परिषदेचे सदस्य नारायराव लोखंडे, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सर्जेराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती़.
देशात जुलमी राजवट सुरु आहे़ युवकांनी पुढाकार घेऊन नरेंद्र मोदी यांची ही जुलमी राजवट उलथून टाकावी, असे आवाहन करुन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख पुढे म्हणाले की, लातूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांचा विजय निश्चित आहे़, त्यामुळे आता युवकांनी पुढकार घेवून काँग्रेस पक्षाला मताधिक्य मिळवून द्यावे़ गेल्या पाच वर्षांत विकासाचे स्वप्न दाखविले गेले तेही फक्त जुमलेबाजी आणि जाहिरातीत़ पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले? या विरोधी पक्षाच्या प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही़ देशातील १३५ कोटी जनतेची मोदी सरकारने फसवणुक केली आहे़, केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी उद्योजकांची घरे भरली़ चौकीदार चोर आहे, हे आता सिद्ध झाले आहे़ असे असुनही हे सरकार पुन्हा एकदा लोकांची फसवणुक करायला निघाले आहे़ राम मंदीर, शेतकरी कर्जमाफी, पीक विमा अशी एक ना अनेक खोटी आश्वासने दिली़ ती पुर्ण केली नाही़ आता नव्याने जुमलेबाजी सुरु झाली आहे़. युवकांनी मात्र मोदी सरकारची चाल आता ओळखली असून देशाच्या भविष्याचादृष्टीने काँग्रेसच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहनही त्यांनी केले़.
Comments