HOME   लातूर न्यूज

एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये!

पद्मश्री डॉ. राजन बडवे यांचे आवाहन..


एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये!

लातूर : जो रुग्ण उपचाराच्या अपेक्षेने रुग्णालयात येतो, तो उपचाराशिवाय परत जाऊ नये. योग्य उपचार करून रुग्ण ठणठणीत बरा करणे हीच डॉक्टरांची जबाबदारी व कर्तव्य आहे व त्यात कसलीही दिरंगाई होता कामा नये. पैशाअभावी एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, याची दक्षता प्रत्येक डॉक्टरने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन टाटा कॅन्सर हॉस्पिटल, मुंबईचे संचालक पद्मश्री डॉ. राजन बडवे यांनी केले.
डॉ. अजय पुनपाळे यांच्या अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त 'लातूर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल'चा लोकार्पण सोहळा व रुग्णांचा स्नेहमिलन सोहळा रविवारी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजन बडवे, पदमभूषण डॉ. अशोक कुकडे, आ. अमित देशमुख, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास शर्मा, जेष्ठ शल्य चिकित्सक डॉ. विनायक श्रीखंडे, हिंदुजा हॉस्पिटलचे कॅन्सरतज्ञ डॉ. हेमंत टोणगावकर, शल्य चिकित्सक डॉ. आनंद नांदे, डॉ. शैलेश श्रीखंडे, डॉ.गिरीश मैंदरकर, डाँ.अजय जाधव, किशन पुनपाळे यांच्या हस्ते संपन्न झाला.
लातूर हे शिक्षण पंढरी तर आहेच. आता ते वैद्यकीय सोयी-सुविधांचेही माहेरघर झाले आहे. लातूरात दर्जेदार आरोग्य सुविधा लातूर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणार असल्याने हे रूग्णांसाठी महत्वाचे असल्याचे मत आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केले. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारात बरे होण्याचे प्रमाण गेल्या दशकभरात चांगले वाढले आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि अद्ययावत प्रशिक्षणामुळे बदल घडत आहेत. डॉक्टरांनी उपचारासोबतच रूग्णांशी योग्य प्रकारे संवादही साधला पाहीजे असे अध्यक्षीय समारोपात पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी योगेश कर्वा यांनी डॉ. पुनपाळे यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. मान्यवरांचे सत्कार श्रीकिशन पुनपाळे, आनंद पुनपाळे, डाँ.विश्वास कुलकर्णी, डाँ.सोपान जटाळ, डाँ.कल्याण बरमदे, डाँ.अशोक पोद्दार, डाँ.घनश्याम दरक, डाँ.संजय पौळपाटील, डाँ.सुधीर जटाळ यांनी केले. याप्रसंगी अनेक नामांकित डाँक्टरांची व प्रतिष्ठीत मान्यवरांची उपस्थिती होती. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी आमदार दिलीपराव देशमुख, डाँ.तात्याराव लहाने, डाँ.विठ्ठल लहाने यांनी सदिच्छा भेट दिली. डॉ. अजय पुनपाळे यांनी प्रास्तविक केले तर संचलन डॉ. ऋजुता आयाचित व आभार डॉ. सौ वर्षा पुनपाळे यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाँ. गणेश स्वामी, डाँ.अतुल देशमुख, रितेश लोया, पप्पू कर्वा, सचिन लोया, नंदकिशोर पुनपाळे, रामेश्वर पुनपाळे, श्याम भट्टड, पवन रांदड, अतुल औसेकर, शिरीष कुलकर्णी आदिंनी परिश्रम घेतले.


Comments

Top