आज जागतिक पुस्तक दिन, लिहा, वाचायला शिकवा
शेक्सपिअर यांच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा होतो हा दिवस
भारती गोवंडे, लातूर: जागतिक कीर्तीचे लेखक, थोर नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा आज स्मृतीदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. मुले आणि युवकांमध्ये पुस्तकांबद्दल प्रेम निर्माण व्हावे, स्वतःचे म्हणून एक पुस्तक त्यांच्याजवळ असावे या उद्देशाने युनेस्कोने १९९५ मध्ये २३
एप्रिल हा दिवस " जागतिक पुस्तक दिन" जाहीर केला आहे.
या जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व वाचक प्रेमींना शुभेच्छा!
या निमित्ताने आज आपण काही वाचुया.
वाचाल तर वाचाल ही म्हण तर आपण सर्वजण फार लहानपणापासून ऐकत आलो आहोत. वास्तविक पाहता वाचनाची आवड सर्वांनाच असते असे नाही. लहानपणापासून ती लावावी लागते. घरातूनच अनेकांना वाचनाची आवड लावली जाते. काहींना शाळेत, तर काहींना मित्रांच्या सहवासातून पुस्तकांची आवड निर्माण होते. मात्र ती आवड टिकविण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते.
पुस्तक आपल्याला सतत काही ना काही शिकवत असतात. पुस्तक विचार देतात, प्रगल्भ बनवितात एवढेच नाही तर व्यक्तीला मानसिक आणि सांस्कृतिक सुदृढ बनवतात. पुस्तकासारखा सच्चा मित्र कोणी नाही. व्यक्तीला सामाजिक भान पुस्तकामुळे अधिक येते. त्याचे एकटेपण दूर करण्याचे कामही पुस्तक करते. बऱ्याचदा पुस्तके लोकांना एकमेकांचे मित्र बनवतात. ज्या घरात पुस्तकांचा संचय असेल ते घर अधिक श्रीमंत असते. समृद्ध असते. आजच्या स्पर्धेच्या युगात मार्कांच्या लढतीत अवांतर वाचन थोडेसे बाजुला पडलेले आहे. बहुसंख्य मुलांचा अभ्यासाव्यतिरिक्तचा वेळ क्लासेस आणि मोबाईलवर गेम खेळण्यात जातो हे लक्षात घ्यायलाच हवे. युवा पिढीचा विचार करता युवापिढी वाचत नाही असे म्हणतानाच बेस्ट सेलर पुस्तकांची जागतिक यादी पाहिली तर युवकांना भावेल अशाच पुस्तकांची नावे आपल्याला दिसतील. जसे अल्कीमिस्ट, द वुमन्स रूम, गॉन वुइथ द विंड, टू किल ए मॉकिंग बर्ड, द सिक्रेट, हॅरी पॉटर, इ टेल ऑफ टू सिटीज, लाईफ ऑफ पाय, द डायरी ऑफ यंग गर्ल अशी किती तरी नावे सांगता येतील. याचाच अर्थ युवक वाचत आहेत हे नाकारून चालणार नाही.
ते इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचत आहेत. इंग्रजी ही जगाची भाषा आहे. बहुसंख्येने याच भाषेतून शिक्षण घेतले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचण्याचे प्रमाण जास्त आहे. आज मोबाईल आणि इंटरनेटच्या महाजालामुळे सर्व प्रकारची माहिती बोटाच्या एका क्लिकवर मिळते. आपल्या गुगल बाबाकडे सर्व काही उपलब्ध आहे. एवढेच नाही तर पुस्तके वाचण्यासाठी अँपही उपलब्ध आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वाचनाची भूक भागविण्याचा प्रयत्न करतो आहे. तरीही आजच्या पुस्तक दिनाच्या निमित्ताने काही सांगावेसे वाटते इंग्रजी पुस्तके जरूर वाचा. पण काही मराठी पुस्तके आवर्जून वाचा, नव्हे त्यांचा आपल्या पुस्तकांच्या संग्रहात नक्कीच समावेश करा. जसे मृत्युंजय, छावा, ययाती, श्रीमान योगी, शेतकऱ्याचा आसूड, माझी जन्मठेप, तराळ- अंतराळ, स्मृतिचित्रे, बलुतं, आमचा बाप आणि आम्ही, व्यक्ती आणि वल्ली, माणदेशी माणसं, नटसम्राट, बापलेकी, ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंचे चरित्र अशी काही वानगीदाखल पुस्तके. जी आपण वाचायलाच हवीत. याशिवाय गो. नि. दांडेकर आशा बगे, व.पु. काळे, अरविंद गोखले, गौरी देशपांडे, विभावरी शिरूरकर, दुर्गा भागवत, ह. मो. मराठे, जी.ए. कुलकर्णी या लेखकांना वाचायलाच हवे. काही लेखकांच्या पुस्तकांचा संग्रह आपण ठेवायलाच हवा. पु.ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, दुर्गाबाई भागवत, सानेगुरुजी अशा लेखकांचे एक तरी पुस्तक घरात हवेच. ही यादी तशी तुटपुंजी आहे, आपण भर घालू या. जाता जाता आणखी एक आजच्या दिवशी संकल्प करू या दिसामाजी काही तरी वाचु या. आपल्या प्रियजनांना, मित्रांना, खास करून मुलांना नेहमीच एका तरी पुस्तकाची भेट देऊ या.
मग तो वाढदिवस असेल नाही तर परीक्षेचे यश असेल. अन्यथा चांगला प्रसंग असेल. एवढेच सांगावेसे वाटते. वाचाल तर वाचाल!
(भारती गोवंडे 9422612748)
Comments