लातूर: सर्वांनाच अवघड वाटणारा गणित हा विषय सोपा करण्याचे मिशन आपण हाती घेतले असून वैदिक गणित पध्दतीमुळे हे शक्य होत आहे. त्याच त्या गणिताच्या पध्दतीमुळे मिनिटांचा वेळ सेकंदावर येऊन ठेपतो. त्यामुळे प्रत्येकाने वैदिक गणित पद्धतीचा अवलंब केल्यास निश्चितच त्याला अभ्यासक्रमांसह स्पर्धात्मक परीक्षेतही घवघवीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास कॅलक्युलेटरपेक्षाही वेगाने गणित सोडविणारे, मानवी संगणक अशी ओळख असणारे प्रा. गौरव भंडारी यांनी व्यक्त केला. लातूरच्या दयानंद सभागृहात राजस्थानी महिला मंडळ आणि लिनन वोग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजस्थानी महिला
मंडळाच्या अध्यक्षा सौ. रेखा खंडेलवाल ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य नरेंद्र खटोड यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करताना प्रा. गौरव भंडारी म्हणाले की, आपल्याकडे गणिताबद्दल विद्यार्थ्यांत नाहक भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळते. प्रत्यक्षात गणित हा विषय मुळीच अवघड नसून ती शिकवण्याची पध्दती योग्य असेल तर विद्यार्थ्यांना तो सहजगत्या समजू शकतो. वैदिक गणित पद्धतीने हे सहज शक्य होते, असे सांगून त्यांनी वैदिक गणित पद्धतीने कितीही अंकी गुणाकार, वजाबाकी, बेरीज, तीन -चार अंकी पाढे, कोणत्या वर्षी कोणत्या तारखेला कोणता वार होता याबाबतची उत्तरे कॅलक्युलेटर व संगणकापेक्षाही कमी वेळेत दिल्याने उपस्थित पालक-विद्यार्थी सर्वच अवाक झाले. प्राचार्य नरेंद्र खटोड यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना गणिताविषयी विद्यार्थ्यांना वाटणारी भीती कशा प्रकारे नाहीशी करता येऊ शकते, याबद्दल मार्गदर्शन करून येणाऱ्या काळात गणित विषयाचे असणारे महत्व व ते आत्मसात करण्याच्या या अनोख्या पद्धतीचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमण रांदड यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी प्रा. गौरव भंडारी यांच्या कर्तृत्वाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच ते येत्या ०८ मे २०१९ ते दि. १२ मे २०१९ या कालावधीत लातुरात गणित विषयाची कार्यशाळा घेणार असल्याचे सांगितले. त्यासाठी इच्छुकांनी लिनन वोग, सावेवाडी, लातूर राजश्री भराडिया (९४२३७७६५८५ ), राजस्थानी महिला मंडळ, सेंट्रल हनुमान, लातूर आणि रमण रांदड (८३७८०८८८८८ ) या ठिकाणी नांव नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री भराडिया यांनी तर आभार प्रदर्शन कमला राठी यांनी केले.
Comments